कोपरगाव तलाठी कार्यालयात अंधार; वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज तोडली

13


सामना प्रतिनिधी । कोपरगाव

बिल भरले नाही म्हणून कोपरगावच्या तलाठी कार्यालयाचा वीजपुरवठा महावितरणने पाच-सहा दिवसांपासून खंडित केला आहे. तलाठी कार्यालयात सर्कल विभाग असल्याने दिवसभर नागरिकांची वर्दळ असते. कार्यालयांसाठी एकाच मीटरवरून वीज देण्यात आलेली आहे. मात्र, या मीटरचे वर्षभराचे अंदाजे 40-50 हजाराचे वीज बिल थकले आहे. महावितरणकडून वारंवार वीज बिल भरण्याबाबत संबंधित विभागास सूचना दिल्या आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने महावितरणने येथील वीजपुरवठा खंडित केला आहे.

तलाठी कार्यालयातील सर्व कारभार ऑनलाईन झाल्यामुळे एक तर बऱ्याचदा सर्वर डाऊन असते किंवा वारंवार बंद पडते. त्यामुळे कामे खोळंबतात. त्यात आता वीजजोडणी तोडल्याने शेतकरी व नागरिकांचे हाल होत आहेत. वीज बंद असल्याने कार्यालयातील पंखे, संगणक व इतर उपकरणे बंद आहेत. कामे होत नसल्याने नागरिकांना दोन दिवसांपासून परत जावे लागत आहे. विविध कामांसाठी नागरिक तलाठी कार्यालयात येतात. याबाबत तलाठी कार्यालयात चौकशी केली असता त्यांचे म्हणणे आहे की तलाठी कार्यालयाची इमारत आणि यातील वीज मीटर वाणिज्य करण्यात आल्याने भरमसाठ वीज बिले येतात. ती बिले तहसील कार्यालयाकडे दरमहा पाठवली जातात परंतु तिकडून बिले न भरल्यामुळे थकबाकी वाढली आहे. संबंधित विभागाकडे चौकशी केली असता या विभागाकडे वीज बिल भरण्यासाठी पैसे आलेले नाहीत. त्यामुळे वीज बिल भरणे शक्य होत नाही असे सांगण्यात आले. तलाठी कार्यालय ऑनलाइन झाल्याने संगणक किंवा ऑनलाईन माहिती घेणे यासाठी अत्यंत आवश्यक आहे असे असताना अधिकाऱ्यांकडून याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या