परळ, लालबागपासून माझगावपर्यंत तासभर बत्ती गुल; रहिवासी घामाघूम

1

सामना ऑनलाईन । मुंबई

तापमानाचा पारा वाढलेला असतानाच आज टाटा पॉवरच्या परळ येथील रिसिव्हिंग स्टेशनमध्ये बिघाड झाल्यामुळे नायगाव, परळ, लालबागपासून भायखळा, माझगाव परिसरात तासभर बत्ती गुल झाली होती. या बिघाडामुळे बेस्टच्या जवळपास 25 ट्रान्सफॉर्मरवरचा वीजपुरवठा खंडित झाल्याने परिसरातील सुमारे दोन लाख ग्राहकांना याचा फटका बसला.

वाढलेला उकाडा आणि आठवडय़ाची सुट्टी असल्याने बहुतांशी मुंबईकर घरातच पंख्याची हवा घेत आराम करत होते. मात्र सकाळी 10.45च्या सुमारास अचानक टाटा पॉवरच्या परळ मेघवाडी येथील रिसिव्हिंग स्टेशनमध्ये स्फोट होऊन ट्रॉम्बे आणि मुंबईबाहेरून येणारा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नायगाव, परळ, लालबाग, शिवडी, माझगाव, भायखळा, ग्रॅण्ट रोड परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ग्राहकांची तासभर गैरसोय झाली. दरम्यान, बत्ती गुल झाल्याने ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्टने नजीकच्या फिडरमधून अनेक ठिकाणी तत्काळ वीजपुरवठा पूर्ववत केला. तसेच टाटाच्या रिसिव्हिंग स्टेशनमधील बिघाड दुरुस्त झाल्यानंतर तासाभरात सर्व ठिकाणचा वीजपुरवठा पूर्ववत झाल्याचे बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रिसिव्हिंग स्टेशनमधील तांत्रिक बिघाड का झाला याच्या चौकशीचे आदेश टाटा पॉवरने दिले आहेत. ऑगस्ट 2018 मध्ये टाटा पॉवरच्या महालक्ष्मी येथील रिसिव्हिंग स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने महालक्ष्मी, पेडर रोड, वरळी, हाजी अली, लोअर परळ परिसरातील वीज ग्राहकांना सामरे तीन तास बत्ती गुलचा सामना करावा लागला होता.

पाच-दहा मिनिटांत रुग्णालयांचा वीजपुरवठा पूर्ववत

रुग्णालयांना क्रिटिकल फिडरवरून वीजपुरवठा केला जातो. परळ येथील तांत्रिक बिघाडामुळे केईएम, टाटा रुग्णालयांचाही वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याची दखल घेत बेस्टने तत्काळ धाव घेत रुग्णालयांसाठी असलेल्या क्रिटिकल फिडरला अन्य फिडरवरून वीजपुरवठा सुरू केला. त्यामुळे केईएम, टाटा रुग्णालयांचा वीजपुरवठा पाच-दहा मिनिटांच्या आत पूर्ववत झाल्याचे आर. जी. सिंग या बेस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.