थकीत वीज बिलामुळे ‘टेंभू’ योजनेचा वीजपुरवठा तोडला

सामना प्रतिनिधी, कराड

कराड तालुक्यासह सांगली, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी गावांना वरदायी ठरणार्‍या टेंभू उपसा सिंचन योजने निधीअभावी बहुतेक कामे बंद असताना 21 कोटी रुपयांच्या थकीत वीज बिलापोटी योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. थकीत वीज बिल भरण्यासंदर्भात टेंभू प्रशासनास वीज कंपनीने नोटीस बजावली आहे.

सांगली जिल्ह्यातील अनेक गांवानी टेंभूचे पाणी सोडावे अशी मागणी केली आहे. मात्र योजनेचा वीज पुरवठा खंडीत असल्याने पाणी देता येणे शक्य नाही. निधी कधी पर्यंत उपलब्ध होईल, याबाबत अधिकारी काही सांगू शकत नसल्याने योजनेवर अवलंबून असणारी शेती धोक्यात आली आहे. 20 वर्षांनंतरही सदर योजना पूर्ण होऊ शकलेली नाही. सुरुवातीला 1416.59 कोटी इतका अंदाजित खर्च होता. या योजनेतून सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील कराड, कडेगाव, खानापूर, तासगाव, आटपाडी, कवठेमहंकाळ व सांगोला या ७ तालुक्यातील सुमारे 79 हजार 600 हेक्टर क्षेत्रास योजनेअंतर्गत सिंचना लाभ देण्याचे नियोजित होते. नंतर यामध्ये वाढ होऊन ते 80 हजार 472 हेक्टर क्षेत्रापर्यंत वाढविण्यात आले आहे. अडीचशे गावांना या योजनेच्या पाण्याचा लाभ देण्यात येत आहे. सुर्ली कालवा, कामथी कालवा व जोड कालवे एक व दोन याद्वारे योजनेचे पाणी सध्या सांगली जिल्ह्यातील दुष्काळी गावांना देण्यात येत आहे. मात्र कालव्यांची कामे अद्याप रखडलेली आहेत.

या योजने अंतर्गत येणारे सिंचन क्षेत्र हे 80 हजार 472 हेक्टर इतके आहे. प्रत्यक्षात 30 हजार हेक्टर इतक्याच क्षेत्राला पाणी देण्यात येत आहे. कारण निधी अभावी कॅनॉलची कामे अपुरी आहेत. 31 पंप आहेत पण यातील 16 ते 18 पंप सुरू करणे शक्य झाले आहे. कामे रंगाळल्याने योजनेचा खर्च चौपटीने वाढला आहे. अद्याप तीस टक्के पर्यंत कामे अपुरी आहेत.

यावर्षी उन्हाळ्यात टेंभू योजनेतून ४ टीएमसीपर्यंत पाणी उचलण्यात आले. पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामात उभारी आलेल्या पिकांना सध्या पाण्याची गरज आहे. पण गेल्या महिनाभरापासून टेंभू योजनेचा वीज पुरवठा थकीत वीज बिलापोटी खंडित करण्यात आला आहे. 21 कोटी रुपयांचे थकित वीज बिल असल्याने वीज कंपनी कार्यालयातून सांगण्यात आले. याबाबत त्यांना नोटीसही बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. टंचाई काळात दुष्काळी गावांना दिलेल्या पाण्याचे लाखो रुपयांचे थकीत बिल सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेले नाही. शिवाय साखर कारखान्यांनी अद्याप पाणीपट्टीची रक्कम अदा केलेली नाही. कृष्णा खोर्‍याकडूनही निधी प्राप्त नसल्याने थकीत बिल भरायचे कसे या विवंचनेत टेंभू प्रकल्पाचे प्रशासन आहे.

summary- electricity supply stopped for tembhu water irrigation plant