मेट्रो धावणार ४० मीटर उंचीवरून

सामना ऑनलाईन, मुंबई

पश्चिम उपनगराला पूर्व उपनगराशी जोडणारी स्वामी समर्थ नगर-लोखंडवाला-विक्रोळी मेट्रो लाइन जमिनीपासून तब्बल ४० मीटर उंचीवरून नेण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. विशेष म्हणजे जोगेश्वरी-विक्रोळीला जोडणाऱया उड्डाणपुलाच्या वरून ही मेट्रो धावणार असल्याने प्रवाशांना शहराचे विहंगम दृश्य पाहण्याची संधी मिळणार आहे.

मुंबईत पहिल्यांदाच इतक्या उंचीवरून रेल्वे धावणार आहे. जोगेश्वरी-विक्रोळीला जोडणाऱया बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाचा विस्तार करण्याची मुंबई महानगरपालिकेची योजना आहे. हा उड्डाणपूल पूर्वेकडून पश्चिम द्रुतगती मार्गावरून सुमारे दोन किलोमीटर जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील प्रतापनगर सिग्नलपर्यंत वाढवला जाणार आहे. त्या मार्गानेच मेट्रोची लाइन टाकली जाणार होती, परंतु उड्डाणपुलाच्या विस्तारामुळे आता स्वामी समर्थ नगर-लोखंडवाला-विक्रोळी ही मेट्रो लाइन या उड्डाणपुलाच्या वरून घेतली जाणार असल्याची माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱयांनी दिली. एमएमआरडीएने यासंदर्भात महानगरपालिकेच्या अधिकाऱयांशी चर्चा केली होती.

  • प्रस्तावित मेट्रो रेल्वे लाइनचे काम येत्या जानेवारीपासून सुरू करण्यात येणार
  • लाइनचे डिझाईन बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
  • बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाचा पश्चिमेकडे दीड किलोमीटर विस्तार करण्याचीही योजना.
  • त्यानंतर या उड्डाणपुलावरून प्रवाशांना पश्चिम उपनगरातून पूर्व उपनगरात प्रवास करणे शक्य होणार.