एल्गार परिषद प्रकरण: पाच जणांची नजरकैद वाढवली, पुणे पोलिसांच्या हाती निराशा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेचं नक्षलवादी कनेक्शन आणि त्याला फंडिंग करण्याच्या आरोपावरून नजरकैदेत असणाऱ्या पाच जणांना आजही दिलासा मिळालेला नाही. या पाच जणांना 12 सप्टेंबरपर्यंत नजरकैदेतच ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने यावेळी दिले आहेत. मात्र पुणे पोलिसांना देखील या पाच जणांच्या अटकेची परवानगी न मिळाल्यानं निराशा हाती लागली आहे.

पुण्यामध्ये 31 डिसेंबर 2017 ला ‘एल्गार’ परिषद झाली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी भीमा-कोरेगाव येथे दंगल उसळली. एल्गार परिषदेतील आयोजनामध्ये नक्षलवाद्यांचा सहभाग आणि शहरी माओवाद्यांकडून आर्थिक मदत केली गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुणे पोलिसांनी मंगळवारी एकाच वेळी मुंबई, ठाणे, हैदराबाद, फरिदाबाद, दिल्लीत छापे टाकून तेलगू कवी वरवरा राव, अरुण परेरा, गौतम नवलखा, व्हरगॉन गोन्साल्विस, सुधा भारद्वाज यांना अटक केली होती. या अटकेला डावे विचारवंत, लेखक, कवी, राजकीय नेत्यांनी विरोध करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या पाचही जणांना नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला होता.

summary: elgar parishad case Supreme Court extended the house arrest of five arrested activists till September 12