एल्फिन्स्टन: पब्लिसिटी स्टंटसाठी उठसूट याचिका नकोत

सामना प्रतिनिधी । मुंबई

एल्फिन्स्टन येथील चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणाऱया तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज चांगलेच धारेवर धरले. या घटनेत तब्बल 23 लोकांचा जीव गेला. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात जीवितहानी झाल्यानंतर आता तुम्हाला जाग आली काय, असा खरमरीत सवालही यावेळी खंडपीठाने केला.

ही घटना अत्यंत गंभीर आणि तेवढीच संवेदनशील आहे; परंतु याचे याचिका करणाऱयांना काहीच वाटत नाही. पब्लिसिटी स्टंटसाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. हे सगळे सामाजिक कार्यकर्ते निव्वळ प्रसिद्धीसाठी हपापलेले आहेत, अशा शब्दांत मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर आणि न्यायमूर्ती एन.एम. जामदार यांनी या सामाजिक कार्यकर्त्याचे वाभाडे काढले.

ठाण्यातील रहिवाशी विक्रांत तावडे आणि काँग्रेसच्या दक्षिण मुंबई विभाग अध्यक्षा स्मिता मयांक ध्रुव यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या.
n या स्थानकांवरील समस्यांबाबत स्मिता धुव यांनी चिंता व्यक्त केली आहे. परंतु काँग्रेसच्या दक्षिण मुंबई विभाग अध्यक्षा असलेल्या स्मिता ध्रुव यांनी या स्थानकांवरील समस्या सोडविण्याच्या दृष्टीने आजपर्यंत काय काम केले, याचे त्यांनी येत्या चार आठवडय़ांत प्रतिज्ञापत्रावर उत्तर द्यावे असेही खंडपीठाने बजावले.

अर्जदारांची चंपी

एल्फिन्स्टन स्थानकासंदर्भात याचिकाकर्ते चिंताग्रस्त असल्याचे भासवत आहेत. या स्थानकावर चेंगराचेंगरीची घटना घडेपर्यंत प्रत्येकाने आपले डोळे मिटले होते आणि घटना घडल्यानंतर हे जनहित याचिका घेऊन न्यायालयात उगवले, अशा शब्दांत खंडपीठाने अर्जदारांची चांगलीच चंपी केली.