महाभयंकर! मुंबईत रेल्वे हत्याकांड २३ ठार, ६१ जखमी

सामना प्रतिनिधी । मुंबई

एलफिन्स्टन आणि परळ स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर गर्दी तशी नेहमीचीच. पुलावरून चालणं कायमच जिकिरीचं असतं. शुक्रवारी सकाळी ही गर्दी मात्र जीवघेणी ठरली. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एकाचवेळी दोन-दोन लोकल आल्या. हजारो प्रवासी एकाचवेळी पुलावर आले. पूल चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी एकच झुंबड उडाली. त्यातच परतीच्या पावसाने घात केला. बाहेर पाऊस पडतोय म्हणून प्रवासी पुलावर थांबले. पूल एकदम अरुंद. पुलाच्या क्षमतेपेक्षा कैक पटीने गर्दी वाढली. गर्दीचा रेटा वाढतच चालला. ना पुढे जाता येईना, ना मागे सरकता येईना. इतक्यात शॉर्टसर्किट, पूल कोसळल्याच्या अफवा उठल्या. प्रचंड चेंगराचेंगरी झाली. प्रवासी गुदमरले, बेशुद्ध पडले. खाली पडले. अक्षरश: पायाखाली तुडवले गेले. आक्रोश, आकांत आणि आरोळ्या! जेवणाचा डबा घेऊन कामाचे ठिकाण गाठणारे नोकरदार, डोक्यावर बोजे वाहणारे कष्टकरी, महिला- मुले सारीच चेंगरली. निप्राण देह पुलाच्या पायऱ्यांवर पडले. पुलावर होणाऱया गर्दीबद्दल वारंवार आवाज उठवूनही रेल्वे प्रशासन ढिम्म राहिले.

रेल्वेच्या या निष्काळजीपणामुळे निरपराध्यांचे बळी गेले. रेल्वेने हत्याकांड घडवले, अशा संतप्त भावना प्रवाशांनी व्यक्त केल्या. चेंगराचेंगरीने तब्बल २३ जणांचे बळी घेतले, तर ६१ जखमी झाले. त्यातील ३६ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भयंकर दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून तीक्र दुःख व्यक्त केले.

उद्धव ठाकरे यांनी केली जखमींची विचारपूस
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुपारी केईएम रुग्णालयाला भेट दिली. जखमी व मृतांच्या नातेवाईकांची उद्धव ठाकरे यांनी विचारपूस केली. त्याचप्रमाणे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांच्याकडून उपचाराविषयी माहिती घेतली. यावेळी रेल्वेमंत्री पीयूष गोयल हेही तिथे पोहोचले असता त्यांच्याशीही या घटनेविषयी चर्चा केली.