एल्फिन्स्टनचा नवा पूल महागच!

18

सामना ऑनलाईन । मुंबई

एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर एल्फिन्स्टन-परळ या दोन रेल्वे स्थानकांदरम्यान बांधण्यात येणारा नवा पूल महाग ठरला आहे. या पुलाची निकड लक्षात घेऊन सैन्य दलाच्या मदतीने तातडीने पुलाची उभारणी सुरू करण्यात आल्याने यासाठी तब्बल ८ कोटी रुपये खर्च आला आहे. हा खर्च नेहमीपेक्षा साधारण ३० ते ४० टक्के जास्त आहे. याशिवाय पुलाच्या उभारणीसाठी लागणारे बांधकामाचे साहित्य देशभरातील रेल्वेच्या विविध कारखान्यांतून आणण्यात मागविण्यात आले आहे.

सैन्य दलाच्या मदतीने एल्फिन्स्टन, करी रोड आणि आंबिवली रेल्वे स्थानकांत पूल बांधण्यात येत आहेत. यापैकी एल्फिन्स्टन पुलाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून फेब्रुवारीमध्ये हा पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. तसेच करी रोड पुलाचेही ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. हे पूल ८ टन म्हणजेच ८० क्विंटल वजन पेलू शकतात.

पुलाच्या उभारणीसाठी हायकार्बन स्टिलचा वापर करण्यात आला असून या पुलाचे आयुष्य ५० वर्षांचे असणार आहे. मुंबई इंजिनीयरिंग ग्रुप ऍण्ड सेंटरचे कमांडर ब्रिगेडीयर धीरज मोहन यांनी सांगितले की, ‘एल्फिन्स्टन-परळ पुलासाठी ८ कोटी रुपये खर्च निश्चित करण्यात आला असून रेल्वेच्या मते हा खर्च ३० ते ४० टक्के अधिक आहे. या पुलाची तातडीची गरज असल्याने जादा खर्च झाला असल्याचेही धीरज मोहन यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या