वडील थोडक्यात बचावले, पण ती वाचू शकली नाही!

147

सामना ऑनलाईन । मुंबई

पश्चिम रेल्वे मार्गावरील एलफिन्स्टन रोड स्टेशनमधून बाहेर पडण्यासाठी असलेला पादचारी पूल आणि जिना या भागात चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत उल्हासनगर येथे राहाणाऱ्या मीना वालेकर (२८) आणि श्रद्धा वर्पे (२३) या दोघींसह २२ जणांचा मृत्यू झाला आणि ३० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

shraddha-varpe

चेंगराचेंगरी झाली त्याच्या थोडा वेळ आधी श्रद्धा वर्पे यांचे वडील किशोर वर्पे हे एलफिन्स्टन रोड स्टेशनमधून बाहेर पडले होते. कामाच्या निमित्ताने ते स्टेशनमधून लवकर बाहेर पडले होते. त्यामुळे दुर्घटनेतून ते थोडक्यात बचावले. मात्र थोड्या वेळानंतर स्टेशनमधून बाहेर पडण्यासाठी पुलावर गेलेल्या श्रद्धा वर्पेचा मात्र चेंगराचेंगरीत मृत्यू झाला.

कापड उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या मसूद आलम (३५) आणि सखील शेख यांचाही चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. मसूद आलम यांना ४ मुलं असून ते गेल्या २० वर्षापासून कामासाठी दररोज अपडाऊन करत होते. तर सखील शेख हे मुंब्र्याचे रहिवासी होते. या दुर्घटनेत यूपीहून दोन वर्षापूर्वी आलेल्या मुकेश मिश्राचा ही समावेश आहे. मुकेश सायन चुनाभट्टीचा रहिवासी असून घरातील कर्ता पुरूष असल्याने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मयुरेश हळदणकर या १८ वर्षीय तरुणाचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. मयुरेश एलफिन्सटन रोड स्थानकातील पूल चढत असताना ही घटना घडली. गणेशोत्सवात गणपतीच्या मूर्तीचे रंगकाम आवडीने करणारा मयुरेश शिवसम्राट मित्रमंडळाचा सक्रीय कार्यकर्ता होता. हल्लीच तो कामाला लागला होता. मयुरेश वरळीच्या बीडीडी चाळीचा रहिवासी असल्याने त्याच्या या आकस्मिक मृत्यूने संपूर्ण बीडीडी चाळीचा परिसर शोकाकूल झाला आहे. मात्र ठार झालेल्या व्यक्तींमधील काही लोकांची अद्याप ओळख पटलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या