एलफिन्स्टनचा ब्रिज अखेर गुदमरला!

सामना ऑनलाईन । मुंबई

सकाळी साडेनऊच्या सुमारास एल्फिन्स्टन रोड आणि परळ या दोन्ही स्थानकांवर चार गाड्या एकाच वेळी आल्या. त्यामुळे चारही गाड्यामधील गर्दी पुलावर गेली. तशात बाहेर पाऊस धो धो कोसळत होता. अचानक आलेल्या या परतीच्या पावसामुळे छत्री न आणलेल्या चाकरमान्यांनी पुलावरच थांबणे पसंत केले आणि तिथेच घात झाला. पुलावर गर्दीचे मोहोळच तयार झाले. एवढ्यात कुठे तरी स्पार्क झाल्याचा आवाज आला आणि शॉर्टसर्किट झाल्याची, पूल कोसळण्याची अफवा पसरली. पुलावर येणारे, पुलावरून उतरणारे अशी जोरदार चेंगराचेंगरी झाली. अनेकजण पायऱ्यांवरून घसरून पडले. त्यांच्यावर गर्दीचा लोंढा कोसळला. एक भयंकर हत्याकांड घडले.

जिवाच्या आकांताने मदतीसाठी टाहो फोडला जात होता. सर्वात तळाकडे दबलेले तर श्वास गुदमरून जागीच गतप्राण झाले होते. हे चित्रच भयानक होते. स्वतःचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात आपण कुणाच्या तरी निष्पाप कलेवराला तुडवतोय याचे भान तर नव्हतेच, पण संवेदनाच मेली होती. शनिवारी दसरा. त्यासाठी एल्फिन्स्टनच्या फूलबाजारात फुले आणण्यासाठी आलेले या गर्दीत होते तर अनेकजण एल्फिन्स्टन पश्चिमेला असलेल्या बिझनेस पार्कमध्ये नोकरी-व्यवसायाला जाणारे. सकाळी साडेनऊची वेळ म्हणजे पीक अवर्स. कार्यालय गाठण्याची धडपड सुरू असतानाच बिचाऱ्या २२ जणांना मृत्यूने गाठले.

चेंगराचेंगरीत काही जण पुलाच्या बाजूला लावलेल्या पत्र्यांमध्ये अडकले. या लोकांना बाहेर काढण्यासाठी शेजारील रेल्वे कॉलनीतून पाना आणि पक्कड मागवावी लागली. जीव वाचविण्यासाठी खाली पडलेल्या प्रवाशांच्या अंगावर पाय देऊन लोक बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होते.

तीन ते चार वेळा चेंगराचेंगरी झाली
साधारण साडेदहा वाजेपर्यंत तीन ते चार वेळा चेंगराचेंगरीचा प्रकार घडला, असे या दुर्घटनेतून थोडक्यात बचावलेले अॅड. आकाश कोटेचा यांनी सांगितले. आकाश जवळच्याच स्वराज्य सोसायटीत राहतात. मागील बाजूच्या ज्या पुलावर ही घटना घडली त्याच पुलावरून ते दररोज चर्चगेटच्या दिशेने जाणारी लोकल पकडतात. आकाश या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले. त्यांचा डावा पाय मुरगळला आहे, पण या परिस्थितीतही त्यांनी मदतकार्य सुरू ठेवले. खाली पडलेल्या लोकांना आम्ही उचलत होतो पण वरून धक्काबुक्की होत असल्याने पुनःपुन्हा लोकं एकमेकांच्या पायात अडकून पडत होते, असे त्यांनी सांगितले.

मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत; घटनेची चौकशी होणार

मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत आणि जखमींवरील उपचारांचा सर्व खर्च शासनाच्या वतीने करण्यात येणार असून या दुर्घटनेची राज्य सरकार आणि रेल्वे विभागाद्वारे सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या दुर्घटनेत दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून रेल्वे प्रशासनाला सर्व सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एलफिन्स्टन येथील घटनास्थळी तसेच केईएम रुग्णालयाला भेट दिली.

फडणवीसांना सांगा, बुलेट ट्रेन आणताय तर बाळाला मम्मी पण आणा!
या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तेरेसा फर्नांडिस या नऊ महिन्यांच्या बाळाच्या आई होत्या. त्यांना एक सहा वर्षांचा मुलगाही आहे. ‘फडणवीस ‘मेड इन इंडिया’ बोलून जपानकडून बुलेट ट्रेन खरेदी करतायत, त्यांना सांगा या बाळासाठी जपानहून एक मम्मी पण आणा’ अशी संतप्त प्रतिक्रिया फर्नांडिस यांच्या नातेवाईकांनी दिली. बुलेट ट्रेनविषयीचा हाच राग इतर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांमध्येही होता. ‘बुलेट ट्रेन नको, आधी रेल्वेचे ब्रिज सुधारा’ असा संताप त्यांनी व्यक्त केला.

शिवसेना मदतीला धावली
घटनेची माहिती मिळताच परळ, लालबाग, एल्फिन्स्टन तसेच दादरमधील शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवसेनेचे उपविभागप्रमुख भारत म्हाडगुत, गजानन चव्हाण यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमींना तसेच तिथे जखमींच्या शोधात येणाऱ्या नातेवाईकांना सहकार्य केले. या परिसरातील शिवसेनेच्या रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी पोहोचल्या. शाखाप्रमुख गोपाळ खाडे यांच्याही रुग्णवाहिकेमधून रुग्णांना रुग्णालयामध्ये आणण्यात आले. रुग्णवाहिकेमधून रुग्णांना स्ट्रेचरवर ठेवणे तेथून त्यांना वॉर्डमध्ये नेणे व त्यांच्यासाठी रक्ताची व्यवस्था करणे या सर्व मदतकार्यासाठी शिवसैनिक धावून गेले. आमदार अजय चौधरी, सदा सरवणकर, सुनील शिंदे, बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ, नगरसेविका सिंधू मसुरकर, नगरसेवक अरविंद भोसले हेही रुग्णालयात पोहोचले.

रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!- शिवसेनेची मागणी
एल्फिन्स्टन तसेच परळ पुलावर दररोज होणाऱया तुफान गर्दीबाबत आणि हे पूल प्रवाशांच्या वाहतुकीसाठी अपुरे असल्याबाबत शिवसेनेने रेल्वे प्रशासनाकडे वारंवार आवाज उठवला. नागरिकांच्या सह्यांची मोहीमही राबविली. याबाबत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत आवाज उठवला. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सहा महिन्यांपूर्वीच येथील परिस्थितीची पाहणी केली होती, मात्र या पाहणीनंतरही रेल्वे प्रशासनाचे डोळे उघडले नाहीत. अशा रेल्वे अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी खासदार अरविंद सावंत आणि आमदार अजय चौधरी यांनी केली आज केली.

पश्चिम रेल्वेने पावसाला जबाबदार ठरविले
परळ आणि एल्फिन्स्टन स्थानकांना जोडणाऱ्या पुलावरील जीवघेण्या चेंगराचेंगरीला पश्चिम रेल्वेने अचानक जोरदार झालेल्या पावसाला जबाबदार ठरवले आहे. शुक्रवारी सकाळी १०.३०च्या सुमारास अचानक जोरदार आलेल्या पावसाने चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण होऊन २२ प्रवाशांचा मृत्यू आणि ३२ जण जखमी झाल्याचे पश्चिम रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.