नाशकात मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅण्डिंग

सामना ऑनलाईन । नाशिक

वजनदार कोण? मुख्यमंत्री की त्यांचा खानसामा?… असा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर पायलटला पडला आणि त्याने हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅण्डिंग केले. खानसाम्याला उतरवताच हे हेलिकॉप्टर अलगदपणे हवेत झेपावले. आत्ता बोला!

गंमतीचा भाग सोडा, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरच्या इमर्जन्सी लॅण्डिंगची ही तिसरी घटना असल्याने ही बाब गंभीर बनली आहे. मुख्यमंत्री आज सकाळी पालकमंत्री गिरीश महाजन, सचिव आणि खानसामा यांच्यासह संभाजीनगरला निघाले; पण क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने पायलटने हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅण्डिंग केले. टेकऑफनंतर थोड्या उंचावर जाताच जास्त वजनामुळे उड्डाणात अडचणी येत असल्याचे जाणवल्यानेच लॅण्डिंग झाल्याचे सांगण्यात येते. सकाळी पावणेदहाच्या सुमारास हेलिकॉप्टरने पोलीस परेड ग्राऊंडवर टेकऑफ केले होते. इंडिया बुल्सचे हे हेलिकॉप्टर आहे. खानसाम्याला उतरवताच ते आकाशात झेपावले.

२५ मे रोजी मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर लातूरमध्ये कोसळले होते. जेव्हा हे हेलिकॉप्टर आकाशात झेपावले तेव्हा हवेच्या प्रचंड दाबामुळे ते हेलकावत विजेच्या तारांवर कोसळले होते.
जुलैमध्ये रायगड जिल्हा दौऱ्यातही असाच बाका प्रसंग ओढवला होता. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच ते उडू लागले तेव्हा सिक्युरिटी गार्डने मुख्यमंत्र्यांना वाचवले होते.