अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या देगलूर नगरपरिषदेच्या लिपीकास अटक

सामना प्रतिनिधी । देगलूर

घरी दही आणण्यासाठी म्हणून आलेल्या अल्पवयीन मुलीला वाईट हेतूने धरणाऱ्या देगलूर नगरपरिषदेच्या एका कर्मचाऱ्याच्या बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला देगलूर पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. ही घटना शनिवारी सकाळी साडे दहा वाजता होट्टलबेस भागात घडली.

शहरातील होट्टलबेस भागात राहणारी पंधरा वर्षाची मुलगी आपल्या आजीच्या सांगण्यावरूनच गल्लीतीलच देगलूर नगरपरिषदेचा वादग्रस्त कर्मचारी हाणमंत मार्तंड संगमकर (५०) याच्या घरी गेली होती. त्यावेळी संगमकर एकटाच घरी होता. वर ये तुला दही देतो म्हणत त्या मुलीचा विनयभंग केला. त्यानंतर त्या मुलीने मोठ्या शिताफीने स्वतःची सुटका करून घेत घर गाठले. घडलेल्या प्रकरणावरून होट्टल बेस भागात मोठी गर्दी जमली होती. अनेक महिलांनी संगमकर याला शिव्याची लाखोली वाहिली. दरम्यान पिडीत अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आरोपी हाणमंत संगमकर याच्याविरोधात देगलूर पोलीस ठाण्यात कलम ३५४ भादंवि व कलम ८,१२ (बाललैगिंक अत्याचार) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पोलिसांनी तात्काळ अटक केली. पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घातले होते. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद गिते हे करीत आहेत.

दरम्यान याच महाभाग नगरपरिषदेतील कर्मचाऱ्याने वसुलीच्या बोगस पावत्या देवून लाखो रुपये लाटले होते, मात्र राजकीय वरदहस्त लाभल्यामुळे त्याला त्यावेळी पाठिशी घालण्यात आले होते.