लखनौमध्ये थरार…दोन दहशतवादी घरात, पोलीस बाहेर!

सामना ऑनलाईन, लखनौ –

मतदानाचा अखेरचा टप्पा तोंडावर असतानाच लखनौच्या ठाकूरगंज भागातील हाजी कॉलनीत आज भरदुपारी जबरदस्त थरार घडला. दोन अतिरेकी आणि पोलिसांमध्ये तासभर जबरदस्त चकमक झडली. घरात लपलेल्या अतिरेक्यांनी पोलिसांवर तुफान गोळीबार केला. हे अतिरेकी आयएसआयचे एजंट असल्याचा संशय असून त्यांनी भोपाळ-उज्जैन पॅसेंजरमध्ये आज सकाळी झालेल्या धमाक्याशी कनेक्शन असावे, असाही अंदाज आहे.

जुन्या लखनौमध्ये ठाकूरगंज हा भाग येतो. चिंचोळय़ा गल्ल्या, लहान लहान दुकाने आणि छोटे छोटे चौक असलेला ठाकूरगंज कायम गजबजलेला असतो. याच परिसरात असलेल्या हाजी कॉलनीतील एका घरात काही जण लपल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, एटीएसने हाजी कॉलनीत झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. पण एका घरातून अचानक गोळीबार सुरू झाला. घरात किती संशयित लपले आहेत याचा अंदाज पोलिसांनाही येत नव्हता. सैफुल्ला असे एका संशयिताचे नाव असून दुसऱयाचे नाव समजू शकले नाही.