लालू यादव यांच्याविरोधात ईडीने दाखल केला गुन्हा

1

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बिहारच्या सत्तेतून बाहेर फेकल्या गेलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ईडीने (सक्तवसुली संचालनालय) लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात मनी लाँडरिंग अर्थात पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रेल्वेच्या हॉटेल कंत्राटांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर ठेवण्यात आला आहे.

युपीए सरकारच्या काळात रेल्वेमंत्री असताना लालू यादव यांनी आयआरसीटीसीच्या बीएनआर आणि सुजाता या हॉटेलांच्या दुरुस्तीच्या कामांच्या कंत्राटांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप ईडीने केला आहे. या प्रकरणी सीबीआयने ७ जुलै रोजी लालू प्रसाद यादव, पत्नी राबडीदेवी, मुलगा तेजस्वी यादव आणि आयआरसीटीसीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांसह पाच इतर पाच जणांविरोधात एफआयआर दाखल केला होता. लालूप्रसाद यांच्याशी संबंधित १२ ठिकाणांवर छापे टाकले होते. सीबीआय पाठोपाठ आता ईडीनेही कारवाई सुरू केल्यामुळे लालू यादव यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

लालूप्रसाद आणि त्यांचे कुटुंबीय आधीच बेहिशेबी संपत्तीच्या प्रकरणात अडचणीत आले आहेत. आयकर विभागाने बेहिशेबी संपत्ती प्रकरणी कारवाई सुरू केली आहे.