इंग्लंड, फ्रान्सची विजयी सलामी;युरो चषक पात्रता फुटबॉल

1

सामना ऑनलाईन । लंडन/पॅरिस

 इंग्लंड आणि फ्रान्स या संघांनी आपापल्या लौकिकास साजेसा खेळ करत युरो चषक पात्रता फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. इंग्लंडने रहीम स्टर्लिंगच्या जबरदस्त हॅटट्रिकच्या जोरावर झेक प्रजासत्ताकचा 5-0 गोल फरकाने धुव्वा उडविला, तर फ्रान्सने मोल्डोवाला 4-1 गोलने धूळ चारली.

स्टर्लिंगची शानदार हॅटट्रिक

लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर झालेल्या या लढतीत यजमान इंग्लंडकडून स्टर्लिंगने 24 व्या मिनिटाला गोल करून आपल्या संघाचे खाते उघडले. मध्यंतरापूर्वीच्या इंज्युरी टाइममध्ये मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर कर्णधार हॅरी केनने गोल करून इंग्लंडची आघाडी 2-0 ने वाढविली. दुसऱया हाफमध्ये इंग्लंडने झेक प्रजासत्ताक संघावर वर्चस्व गाजविले. स्टर्लिंगने 62 व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा गोल केल्यानंतर पुढच्या सहाव्या मिनिटाला गोलची हॅटट्रिक पूर्ण करून इंग्लंडची आघाडी 4-0 अशी आणखी भक्कम केली. हे चार गोल कमी की काय म्हणून झेक प्रजासत्ताकच्या टॉमस कालासने स्वयंगोल करून इंग्लंडचा विजय 5-0 ने फरकाने वाढविण्यास हातभार लावला.