इंग्लंडची बाद फेरीत धडक, मेक्सिकोवर ३-२ फरकाने मात

सामना प्रतिनिधी, कोलकाता

संभाव्य विजेत्या इंग्लंडने मेक्सिकोवर ३-२ गोल फरकाने मात करीत कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत धडक दिली. पहिल्या सत्रात इंग्लंडने वर्चस्व गाजविले. दुसऱ्या सत्रात मेक्सिकोने इंग्लंडला चांगली लढत दिली, मात्र सामन्यात बरोबरी साधण्याची किमया त्यांना साधता आली नाही.

सामना सुरू झाल्यानंतर जवळपास अर्धा तास दोन्ही संघांना गोलपोस्टवरची कोंडी फोडता आली नव्हती. अखेर इंग्लंडच्या रिहान ब्रिस्टरने ३९व्या मिनिटाला फ्री-किकवर इंग्लंडसाठी गोल करत गोलपोस्टवरची कोंडी फोडली. यापाठोपाठ फिलीप फोडेनने ४८व्या मिनिटाला आणि जाडोन सँचोने ५५व्या मिनिटाला गोल करून इंग्लंडला ३-० अशी जोरदार मुसंडी मारून दिली. हा सामना एकतर्फी होतोय असे वाटत असतानाच मेक्सिकोने सामन्यात जोरदार पुनरागमन करत सामन्यात रंगत आणली. दिएगो लेनिझने ६५ आणि ७२ व्या मिनिटाला गोल झळकवत इंग्लंडची आघाडी २-३ ने कमी केली.