जेसन रॉयचा शतकी झंझावात, इंग्लंडचा पाकिस्तानवर मालिका विजय

10

सामना ऑनलाईन । ट्रेंटब्रिज

कौटुंबिक अडथळय़ांवर मात करीत जेसन रॉयने क्रिकेटच्या मैदानावर धडाकेबाज कामगिरी करीत इंग्लंडला देदीप्यमान विजय मिळवून दिला. नुकतीच जन्मलेली मुलगी आजारी असल्यामुळे आदल्या दिवशी पुरेशी विश्रांती मिळाली नसतानाही त्याने देशासाठी सर्वस्व पणाला लावले. त्याच्या 89 चेंडूंतील 114 धावांच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर यजमान इंग्लंडने शुक्रवारी झालेल्या चौथ्या वन डे लढतीत पाकिस्तानवर 3 गडी व 3 चेंडू राखून सनसनाटी विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. जेसन रॉय याचीच ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली.

पाकिस्तानकडून मिळालेल्या 341 धावांचा पाठलाग करणाऱया इंग्लंडने 7 गडी राखून विजय संपादन केला. जेसन रॉय व जेम्स विन्स या सलामीवीरांनी 94 धावांची भागीदारी करीत इंग्लंडला आश्वासक सुरुवात करून दिली. जेम्स विन्स 43 धावांवर बाद झाला, पण जेसन रॉयने आपल्या खेळीत चार सणसणीत षटकार व 11 चौकारांची बरसात केली. जो रूटनेही 36 धावा केल्या. अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने नाबाद 71 धावांची खेळी करीत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पाकिस्तानकडून इमाद वासीम व मोहम्मद हसनैन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

दरम्यान, त्याआधी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने 7 बाद 340 धावा करताना इंग्लंडच्या गोलंदाजांवर पुन्हा एकदा वर्चस्व गाजवले. फखर जमानने 57 धावांची, बाबर आझमने 115 धावांची, मोहम्मद हाफीजने 59 धावांची आणि शोएब मलिकने 41 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून टॉम करणनने 75 धावा देत 4 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

आपली प्रतिक्रिया द्या