मस्त संतुलित आवडीचं खायचं आणि आनंदात राहायचं…

डॉ. विजया वाड

‘आजोबा, रामदेवबाबाचं नवं भाकित पेपरमध्ये आलंय बघा’ राजस म्हणाला. ‘काय लिहिलंय रे राजसा?’
‘प्रत्येक माणसाचं आयुष्य ४०० वर्षे होणार. म्हणजे मज्जा ना! तुम्ही आता एटीफोर आहात ना? अजून तीनशे सोळा वर्षे! मी वीस म्हणजे अजून तीनशे ऐंशी वर्षे! ओ माय गॉड… काय मौज?’
‘अरे नको नको एवढे जिणे. आता आनंदाने कोणत्याही क्षणी यावे शांतीदुतांचे बोलावणे. जगलो बहु आनंदाने. जातानाही देतो सुंदर आशीर्वचने. शुभम भवतु. शुभम भवतु.’
‘आई, आजोबांना एटीफोरच कसं पुरेसं वाटतं गं?’ राजसनं मोठय़ाच आश्चर्याने विचारलं. ‘असं का म्हणता तुम्ही? माझ्याकडून काही कमी पडतं का?’ सून रोहिणी विचारती झाली.
‘नाही गं माझी बाय! तुझ्यासारखी सून हे माझं भाग्य. पण जगायचं, तर हात दुखतो, मान मोडते, गुडघे बोलतात… चालू नको बजावतात नि पलंगाला खिळवतात असलं जगणं काय कामाचं गं रोहिणी? चारशे वर्षं जगून करणार काय? आत्ताच मधुमेह, रक्तदाब, संधिवात, पित्तविकार हे चार मित्र अहोरात्र सोबत करीत आहेत.’ आजोबा हसले मग रोहिणीकडे बघून म्हणाले, ‘तू फार गोड मुलगी आहेस. फक्त एकच मागणंय. गोड खावंसं वाटतं गं. फार नाही. दोन चमचे श्रीखंड, गुलाबजाम दे या मधुमेह्याला. काय होईल? फार तर या खाटेवरच्या देहाचे चार दिवस कमी होतील. एवढंच ना? सब चलता है! अगं जगू दे आनंदे, कळलं का? मी सांगू का? माणसं जिवंत असतानाच सर्व लाड करावे. हे खाऊ नको, ते खाऊ नको… कशाला? मग मेल्यावर फोटोपुढे नैवेद्य. आजोबांना श्रीखंड आवडायचं म्हणत…नि डोळा पाणी!’
‘थांबा बाबा. मी आज बासुंदी केलीय. प्या.नैवेद्याची वाटीभर.’
सून रोहिणी छोटी चांदीची वाटीभर बासुंदी घेऊन आली. आजोबांनी ती बहुप्रेमे सेवन केली… आणि आनंदाने म्हणाले, ‘आयुष्यमान भव बेटी…’ आपल्या घरच्या वयस्कांना असंच आनंदी ठेवा मित्रांनो…