…काळ सुखाचा!

आजच्या काळात ६० नंतरचा काळ ही दुसरी इनिंग मानली जाते. मुळात आपल्याकडे, आपल्या या पानावर वृद्धत्व, म्हातारपण या शब्दांना जागाही नाहीए… आणि वेळही नाहीए. कोणत्याही वयात आपल्या आवडीचे काम करीत राहणे हे आपले इप्सित. पण या कामातून, व्यस्त दिनचर्येतून थोडासा वेळ स्वत:साठी काढायलाच हवा…

  •  तुमच्या जोडीदाराची काळजी घ्या. त्यांच्यासाठी सुंदर भेटवस्तू आणा. हाती असलेला पैसा दोघांनी मिळून वापरा. छोट्या छोट्या प्रसंगांवरून त्रास करून घेऊ नका. तुम्ही आयुष्यात पुष्कळ सुख-दुःखाच्या घटना अनुभवल्या आहेत. त्यामुळे भूतकाळातील वाईट आठवणींमुळे किंवा भविष्यकाळातील चिंतेमुळे तुमचा ‘आज’ खराब होऊ देऊ नका.
  •  आयुष्यात गुंतवणूक महत्त्वाचीच… पण कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीसाठी ही वेळ योग्य नाही. शक्यतो या काळात गुंतवणूक करू नका. योग्य वेळ कोणती ते जाणून घ्या. त्यासाठी वर्तमानपत्रे, टीव्ही यांचा वापर करा. योग्य वेळी गुंतवणूक करा आणि ताणविरहित, शांतपणे आयुष्य जगा.
  •  आपले आरोग्य चांगले कसे राहील याची काळजी घेत चला. यासाठी झेपेल तेवढाच व्यायाम करा. चांगले खा. भरपूर विश्रांती घ्या. नियमितपणे वैद्यकीय तपासणी करून घ्या. आपल्या डॉक्टरच्या संपर्कात रहा. रोज लागणारी औषधे जवळ बाळगा.

वृद्धत्व आनंदाने स्वीकारा…
बहुतेक मंडळी वृद्धत्व आले म्हणून रडत बसतात. फारच थोडी मंडळी वृद्धत्वाचा आनंदाने स्वीकार करतात. आयुष्य फार छोटे आहे. त्यामुळे असे करू नका. नेहमी आनंदी लोकांच्या संगतीत राहा. त्यांच्यामुळे तुम्हीही आनंदी राहाल. निराश, दुःखी, रडय़ा, नकारात्मक लोकांपासून दूर राहा. दुःखी, निराश लोक कोणालाच आवडत नाहीत, हे लक्षात ठेवा. नेहमी आनंदी हसतमुख माणसेच लोकांना आवडत असतात.

आमच्या वेळी असे होते… म्हणू नका!
काहींना सतत आमच्यावेळी तसे होते, असे म्हणून जुन्या आठवणी काढण्याची सवय असते. असे म्हणत असताना तुमचीही वेळ आत्ताचीच आहे, कालची नाही, हे विसरू नका. आताचे, आजचे आयुष्य आनंदात कसे घालवायचे याचा विचार करा. तरुणांचा व त्यांच्या मतांचा आदर करा. तुमच्या व त्यांच्या विचारात पिढीप्रमाणे फरक असणे साहजिक आहे. उद्याचा भविष्यकाळ त्यांचाच आहे, म्हणून काही परिस्थितीत त्यांचाही सल्ला घ्या. त्यांना आवश्यकतेनुसार मित्राप्रमाणे मार्गदर्शनही करा. तरुणांवर उगीच टीका करू नका. त्यांचे दोषही काढत बसू नका.

प्रत्येकजण पोटासाठी आणि मुलाबाळांसाठीच कमावतो. तुम्हीही आतापर्यंत कष्ट, मेहेनत, काटकसर करून जे काही पैसे कमवले आहेत, ते स्वतःसाठी खर्च करायला कमीपणा मानायचे नाही. बिनधास्त खर्च करायचा. आत्ता नाही तर कधी करायचा?

तुम्ही तुमच्या मुलाबाळांना इतकी वर्षे संभाळले, त्यांना अन्न-वस्त्र -निवारा दिलात. चांगले शिक्षण दिलेत. आता त्यांच्या उदरनिर्वाहासाठी लागणारे पैसे त्यांना कमवू द्यात. मुलाबाळांच्या किंवा नातवंडांच्या आर्थिक परिस्थितीची अजिबात चिंता करू नका. कारण तुम्ही कष्टाने मिळवलेल्या पैशांची किंमत सर्वांनाच असते असे नाही, हेही लक्षात घ्या.

वेळच्या वेळी ब्युटी पार्लर किंवा सलूनमध्ये जाऊन केस कापून घ्या. दंतवैद्यांकडे जाऊन दात, हिरड्यांची तपासणी नियमित करा. आवडत्या पावडरी, पर्फ्युम्स बिनधास्त वापरा. कपडे नीटनेटके ठेवा. बाहेरून तुम्ही जितके चांगले रहाल तेवढे आतून समाधानी असाल.

तरुणपणी कामाच्या गडबडीत तुम्हाला फॅशन करायला वेळ मिळाला नाही. पण आता निवृत्त झाल्यावर तरी खुशाल फॅशन करा. ज्येष्ठ मंडळींसाठी नवीन फॅशन्स काय आहेत, कोणत्या आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. थोडे फॅशनेबल राहिलात तर तरुणांनासुद्धा तुम्ही त्यांच्यातले वाटाल आणि आवडू लागाल.

तरुणपणी मित्रमैत्रिणींच्या गराडय़ात राहिला असाल. आता काय करायचं त्यांच्या संपर्कात राहून? असा विचार न करता पूर्वी आपल्या वर्गात शिकणाऱ्या मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात राहायचा जास्तीतजास्त प्रयत्न करायचा. कारण त्यात मोठा आनंद दडलेला असतो.