रायगड किल्ल्याचा प्रवेश महागला; 10 ऐवजी आता द्यावे लागणार 25 रुपये शुल्क

13

सामना प्रतिनिधी । महाड

हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर जाण्यासाठी आता दहाऐवजी 25 रुपये एवढे प्रवेश शुल्क द्यावे लागणार आहे. पुरातत्व विभागाने करामध्ये वाढ केल्याने लाखो शिवभक्त नाराज झाले असून सर्वसामान्य पर्यटकांना गडावर जाण्यासाठी जादा पैसे खर्च करावे लागणार आहे. ही शुल्कवाढ रद्द करून पुन्हा दहा रुपयेच करावा, अशी मागणी असंख्य शिवभक्त व पर्यटकांनी केली आहे.

रायगड किल्ला म्हणजे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे वैभव असून दरवर्षी शिवराज्याभिषेक व शिवपुण्यतिथीच्या दिवशी राज्याच्या विविध भागांतून लाखो तरुण शिवभक्त गडावर कूच करतात. ढोल-ताशांचा गजर, भगवा ध्वज आणि शिवाजी महाराजांचा जयजयकार यामुळे पुन्हा एकदा शिवकाळ अनेकांना अनुभवता येतो. दरवर्षी रायगड किल्ला पाहण्यासाठी 7 ते 10 लाख पर्यटक येतात.

रायगड किल्ल्यावर रोपवे आणि पायऱ्यांवरूनदेखील जाता येते. दोन्ही ठिकाणी पुरातत्व विभागामार्फत पूर्वी दहा रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येत होते. आता त्यात दीडपट वाढ करून हे शुल्क 25 रुपये झाले आहे. केंद्र सरकारने देशातील सर्व ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी प्रवेश करात वाढ केली असल्याचे स्पष्टीकरण पुरातत्व विभागाचे अधिकारी व किल्ले रायगडचे निरीक्षक बाबासाहेब जंगले यांनी केले आहे.

निधी जातो तरी कुठे?
प्रवेश शुल्कापोटी पुरातत्व विभागाला दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल मिळतो. मात्र त्यातील एक रुपयाही रायगडाच्या डागडुजीसाठी खर्च केला जात नाही. मग हा निधी जातो तरी कुठे? असा संतप्त सवाल कोकणकडा मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी केलेली शुल्कवाढ त्वरित रद्द करावी, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या