प्रलय दिनाची तयारी?

>>दिलीप जोशी <<

[email protected]

माणूस वगळता इतर सर्व सजीव केवळ ‘आता’चा विचार करतात. ‘विचार करतात’ असं म्हणणंही तितकंसं बरोबर नाही, पण नैसर्गिक प्रेरणेनेच ती मंडळी ‘हिअर ऍण्ड नाऊ’ सिद्धांतानुसार जगतात. मधमाश्या आणि मुंग्या पोळय़ात आणि वारुळात धान्यसाठा करतात हे खरं, पण तेसुद्धा नैसर्गिक ऊर्मीने. माणूस मात्र विचारपूर्वक (किंवा अविचाराने) अनेक गोष्टी घडवत असतो.

सजीव म्हणून जन्माला आलेल्या स्थितीतच आपल्या आदिम पूर्वजांचा काही काळ गेला असेल, पण संधी मिळताच सभोवतालचं वातावरण आपल्या अनुकूल करून घेण्याची बुद्धी माणसाकडेच आहे. त्यातूनच तो गुहेतलं जीवन सोडून बाहेर आला. नगररचना झाली. कपडे आणि दागदागिने आले. निसर्गतः निर्माण होत नसलेले विविध चवींचे खाद्यपदार्थ आले. हजारो बोलीभाषा आल्या आणि जगातील माणसांचा परस्परांशी संवाद सुरू झाला. संवाद, विचारविनिमय आणि समूहशक्ती यातून माणसाने नैसर्गिक सृष्टीमध्येच स्वतःची अशी प्रतिसृष्टी साकारली.

उत्तुंग इमारती, रेल्वे, विमान अशी वाहने आणि कॉम्प्युटर युगातली आताची सुपरफास्ट संपर्क साधने! माणसाच्या प्रगतीचा आलेख चढताच राहिला, मात्र ते करत असताना त्याने ‘सेल्फिश जीन’ किंवा स्वाभाविक स्वार्थानुसार जगाकडे पाहिलं. त्याच्या या प्रगतीने बाकीचे प्राणी अचंबित झाले की नाही ते कसं कळणार, पण बऱयाचदा ते भयभीत मात्र झाले.

काँक्रीटची जंगलं उभारण्यासाठी केलेली अमाप जंगलतोड त्यातील माणसांबरोबर पशुपक्ष्यांनाही बेघर करू लागली. ‘पैसा’ नावाची जादुई गोष्ट निर्माण करून माणसाची जितकी व्यावहारिक सोय झाली तितकीच विषमताही वाढली. शहरी आणि ग्रामीण जीवनात अंतर पडले. आधुनिकतेची कास धरताना निसर्गाचा ऱहास होत आहे हे आधी लक्षात आले नाही आणि नंतर अनेक कारणांनी थांबता आले नाही.

एक विचारी प्राणी म्हणून माणसाच्या बुद्धीची झेप अंतराळ कवेत घेण्याइतकी वाढली, पण त्याचबरोबर ‘प्राणी’ म्हणून असलेल्या भावनांच्या आहारी जात पृथ्वीवरचे संघर्षही वाढले. उदात्त, उन्नत कार्याबरोबरीनेच उत्पाती आणि उद्ध्वस्त करणाऱया कारवायाही माणूस करू लागला.

अवघ्या दोन-तीन शतकांत अपूर्व प्रगती साधणाऱया माणसाला आता संभाव्य आत्मनाशाची भीती भेडसावू लागली. जगभर डागलेली आण्विक अस्त्र्ां कुणा माथेफिरूच्या हाती पडली तर? प्रदूषणाचा महाराक्षस आटोक्यात आणता आला नाही तर? नैसर्गिक चक्राबरोबरच मानवनिर्मित प्रदूषणाने ‘ग्लोबल वॉर्मिंग’चा वेग वाढून समुद्र खवळला तर? विचित्र असाध्य रोगांनी आपली प्रजाती धोक्यात आली तर?

‘सुख दुखतंय’ अशी ही प्रगत माणसाची अवस्था. सारं काही आहे, पण ‘उद्या’ची निश्चिती नाही. तथाकथित प्रगतीमुळे आश्वस्त होण्याऐवजी माणूस अधिकाधिक अस्वस्थ होत चालला. वेगवान प्रगतीची (किंवा नुसत्याच गतीची) भीषण सत्यंही त्याला दिसू लागली.

मग काही सुज्ञ एकत्र आले. समजा, कालांतराने कोणत्याही कारणाने मानवजातीला ‘डूम्स डे’ किंवा विनाशदिनाचा सामना करावा लागला तर? हिमयुग अवतरलं तर? समुद्राने बराच भूभाग गिळला तर?… तर या ग्रहावर माणूस नावाचा एक ‘प्रगत’प्राणी राहत होता हे उरल्यासुरल्यांना समजावं आणि नवयुग निर्माण करण्यासाठी त्यांना आताच्या प्रगत युगातील माहिती उपलब्ध व्हावी म्हणून ‘नॉर्वे’ देशातील स्वॅलबार्ड पर्वतातील १००० फूट खोल भूगर्भात पृथ्वीवरच्या सर्व संस्कृतीची नोंद एका भक्कम व्हॉल्टमधे (तिजोरीत) सुरक्षित ठेवण्यात येणार आहे. ‘डूम्स डे’नंतर (विनाशदिन) जेव्हा केव्हा नव-मानवी संस्कृतीच्या हाती हा खजिना लागेल तेव्हा त्यांना पुन्हा प्रगती करणं सोपं जाईल. डिजिटाइज्ड केलेला हा माहितीचा खजिना चलत्चित्राच्या स्वरूपात असल्याने भावी युगातील मानव समाजाला तो उपयुक्त ठरेल असं या ‘पिकल’ कंपनीच्या ‘वर्ल्ड आर्क्टिक अर्काइव्ह’ किंवा ध्रुवीय प्रदेशातल जागतिक जतनालय निर्माण करणाऱया वैज्ञानिकांना वाटतं. शिवाय नष्ट न होणाऱया आणि ‘हॅक’ करता येणार नाही अशा फिल्मचा वापर करून त्यावर नोंदलेली माहिती ‘चिरंतन’ राहील असा विश्वास त्यांना वाटतो. मात्र या व्हॉल्टमध्ये वितळत्या बर्फाचे पाणी शिरल्याचीही ताजी बातमी आहे.

‘आता कशाला उद्याची बात’ म्हणून याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. प्रलय-विलय काळ रोखता येण्याइतपत प्रगती माणसाने केली तर ठीकच. त्याने आपल्या हाताने ‘डूम्स डे’ ओढवून घेऊ नये इतकंच. तेवढंच आपल्या कह्यात असून त्याकडे लक्ष द्यायला हवं. सुनामी रोखण्याची किंवा अवकाशातून अशनी आला तर तो थोपवण्याची शक्ती विज्ञानाने दिली तर ठीक अन्यथा ‘प्रलय’ लय दूर नाही. केवळ प्रदूषणाने २०१५ मध्ये ३८००० माणसांना हे जग सोडावं लागल्याचं वृत्त आहे. तेव्हा सावध, ऐका पुढल्या हाका!