अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकरी धास्तावले, काढलेला कांदा वाचविण्यासाठी धडपड सुरू


सामना प्रतिनिधी, कवठे येमाई

शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अवकाळी पावसाचे वातावरण होत असल्याने शेतकरी धास्तावले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ढगांचा कडकडाट, वादळी वारे व काळेकुट्ट ढग व पावसाचा पडणारा जेमतेम शिडकावा एकीकडे कडक उन्हाळा,त्यातच पाणी टंचाईचे संकट व आता अवकाळीचे अस्मानी संकट अशा सर्वच बाजूनी शेतकरी संकटात सापडले असून उपलब्ध पाण्यावर घेतलेला व काढणी केलेला कांदा, पडलेले बाजारभाव व अवकाळी पावसाचा धसका घेत दगडी चाळीत साठविण्याचे युद्धपातळीवर काम सुरु असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहे.

शिरूरचा पश्चिम भाग हा कांदा पिकाचे आगर समजले जाते. बाजारभाव असल्यास हमखास पैसे मिळवून देणारे पीक म्हणून कांदा पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. कवठे येमाई येथील शेतकरी विलास बांगर यांनी आपल्या जेमतेम जमिनीत कांदा पीक घेतलेय. अहोरात्र काबाडकष्ट घेऊन हाताशी आलेला कांदा चार पैसे होतील या आशेने व अवकाळीच्या तडाख्यात सापडू नये म्हणून बांगर कुटुंब भल्या पहाटेपासूनच आज कांदा दगडी चाळीत भरण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

हीच परिस्थिती तालुक्याच्या पश्चिम भागातील सविंदणे, मलठण, पिंपरखेड, टाकळी हाजी व इतरही गावात असून अवकाळी पावसाच्या धसक्याने शेतकऱ्यांची आहे ती पिके वाचविण्याची धावपळ पाहावयास मिळत असून शेतकरी मात्र सर्वच बाजुंनी संकटात सापडला असल्याचे चित्र दिसून येत आहे.