शिवसेनेच्या प्रयत्नाने ठाकुर्ली स्थानकात सरकते जिने, उभे राहा…आणि पुढे सरका!

सामना प्रतिनिधी, डोंबिवली

रेल्वे स्थानक म्हटले की गर्दी आणि धक्काबुक्की आलीच. त्यातही लोकल व स्थानकातील जिन्यावरून चढ-उतार करणे म्हणजे अक्षरशः नकोसेच. मात्र शिवसेनेच्या प्रयत्नामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवलीपाठोपाठ आता ठाकुर्ली स्थानकातही सरकते जिने बसविण्यात आले आहेत. त्यामुळे गर्दीतून जिने चढताना होणारी धक्काबुक्की थांबणार असून आरामात पादचारी पुलावर जाता येणार आहे. या जिन्यांमुळे हजारो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वे मार्गावरील सर्वच स्थानकांवर सरकते जिने बसविण्याचे जाहीर केले होते. मात्र सरकारीबाबूंच्या लालफिती कारभारामुळे हे काम पूर्ण होण्यास अनेक ठिकाणी वेळ लागत आहे, परंतु शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नामुळे ठाणे तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघातील रेल्वे स्थानकांवर सरकते जिने बसविण्यात आले आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ठाकुर्ली रेल्वे स्थानकातही बसविण्यात आलेल्या सरकत्या जिन्यांचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह हजारो प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे.

लोकार्पणाचा कोणताही गाजावाजा नाही
एखादे चिरकुट सार्वजनिक काम केले की त्याचे श्रेय उपटण्यासाठी अनेकदा राजकीय पक्ष मोठा बडेजावपणा करतात. मात्र शिवसेनेच्या प्रयत्नातून या स्थानकांवर झालेल्या सरकत्या जिन्यांचे लोकार्पण कोणताही गाजावाजा न करता करण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी शिवसेनेचे कौतुक केले आहे.

तिकीट कार्यालयही सेवेत
शिवसेनेने स्थापन केलेल्या खासदार रेल्वे प्रवासी समन्वय समितीने सरकत्या जिन्यांबरोबरच स्थानकाजवळील म्हसोबा मंदिराजवळ पूर्वेला तिकीट कार्यालय सुरू करावे, अशी मागणी केली होती. त्याची दखल घेत प्रशासनाने या ठिकाणी अद्ययावत तिकीट कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर या स्थानकातील फलाटांच्या रुंदीकरणाचेही काम करण्यात आले आहे.

वचन दिले, पूर्ण केले!
शिवसेना नेहमीच दिलेले वचन पूर्ण करते. कल्याण, डोंबिवली, ठाकुर्लीतील रेल्वे प्रवाशांसाठी सुविधा आणि सरकते जिने उभारण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे मी पाठपुरावा केला आणि आज ठाकुर्लीसारख्या रेल्वे स्थानकात तो प्रत्यक्षातही आला. त्यामुळे हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे