जेव्हा जंगलचा राजा रस्त्यावर येतो


सामना ऑनलाईन। कुवैत

जर तुम्ही बाहेर जाताय आणि रस्त्यात अचानक तुमच्यासमोर जंगलचा राजा सिंह येऊन उभा राहीला तर. विचार केला तरी काळजाचा थरकाप उडतो. पण अशीच घटना कुवैतमधील एका रहिवाशी भागात घडली आहे. येथील वर्दळ असलेल्या भागात रस्त्यावरच एक सिंहाने बसकन मारली भररस्त्यात सिंह अवतरल्याचे बघून अनेकांची बोबडीच वळली तर काहीजणांनी आपल्या गाडीसह तेथून धूम ठोकली. वनराजाच्या रस्त्यावरील भ्रमणाचा व्हिडीओ वायरल झाला असून लाखो लोकांनी तो बघितला आहे.

खलीज टाईम्सने याबद्दल माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार गेल्या बुधवारी कुवैत मधील कबाद जिल्हयात हा सिंह अवतारला. पण रस्त्यावरची वाहन बघून वनराज गोंधळले. आजूबाजूने जाणाऱ्या गाड्यांच्या हॉर्नच्या आवाजाने बिथरलेल्या या सिंहाला कुठे जावे तेच कळत नव्हते. यामुळे त्याने भररस्त्यातच बसकन मारली. रहदारीच्या रस्त्यावरच सिंह बसलेला बघून कार चालकांना दरदरुन घाम फुटला. तर घाबरल्याने काहीजणांनी रस्त्यातच गाडी थांबवली. यामुळे ट्रॅफिक जॅम झाले. मागच्यांना कळेना पुढचे का थांबलेत आणि पुढच्यांनाही सिंहाला वळसा घालून गाडी कशी पळवायची ते कळेनासे झाले. बराचवेळ हा गोंधळ सुरू होता. रस्त्याच्या दुतर्फा गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अखेर एकाने गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला ते बघताच सिंहाने त्याच्या दिशेने झेप घेतली. सिंह आपल्याकडेच येत असल्याचे बघून तो चालक चांगला हादरला व घाबरुन पुन्हा गाडीत जाऊन बसला.

शेवटी सिंहामुळे ट्रॅफिक जॅम झाल्याची बातमी वाऱ्यासारखी कुवैतभर पसरली. मग काय पोलीस, सुरक्षा पथक, प्राणीसंग्रहालयाचे अधिकारी अशी सगळीच पलटण कबाद जिल्हयात येऊन धडकली. त्यानंतर सिंहाला बेशुद्धीचे इंजेक्शन देण्यात आले. नंतर त्याला प्राणीसंग्रहालयात सोडण्यात आले.

हा सिंह पाळीव होता. त्यामुळे त्याला शिकार करणे ठाऊक नव्हते. म्हणूनच तो शांतपणे रस्त्यावर बसून सगळ्यांच्या हालचाली बघत होता. अखेर त्याला एका व्यक्तीने पाळल्याचे समोर आले. पण कुवैतमध्ये वन्यप्राण्यांना पाळणे गुन्हा असल्याने संबंधित व्यक्तीला तीन वर्षाचा कारावासाची शिक्षा होणार आहे.