व्होटिंग मशीन सुधारणा

मच्छिंद्र भोरे

व्होटिंग मशीनमध्ये घोळ असल्याच्या आरोपावरून मध्यंतरी सर्वच विरोधी पक्षांनी गदारोळ केला. अजूनही आरोप होतच आहे. मोदी लाटेमुळे भाजपला एवढा मोठा विजय मिळाला असेलही, पण त्यात कोणालाही शंका येऊ नये म्हणून व्होटिंग मशीन सुधारणा करण्याची गरज आहे. कॉम्प्युटर सेटिंग केल्यास प्रत्येक २० मतदानांनंतर कोणतेही बटण दाबले तरी सेटिंगनुसार ठरावीक उमेदवारालाच मत मिळू शकते किंवा अशाच अनेक प्रकारे सेटिंग करून विशिष्ट उमेदवारास मते पडू शकतात. सुधारणा अशी की, मतदाराने इच्छित उमेदवारास बटण दाबून मतदान करताच त्याच्यासमोरील बोर्डवर ज्यास मतदान गेले त्याचे नाव व चिन्ह स्पष्ट दिसावे. नंतर  मतदान केल्याची प्रिंटेड पावती त्यास तिथेच मिळावी. पावतीवर कोणास मतदान केले ते सांकेतिक भाषेमध्ये प्रिंट व्हावे. ती पावती घेऊन बाहेर पडल्यावर केंद्राधिकाऱयाने त्यावर सही करावी. एखाद्यास आपले मत दुसऱयास गेले अशी शंका आल्यास निवडणूक आयोग फी घेऊन पावतीवरील कोडमधील क्रमांकानुसार त्याचे शंकानिरसन करू शकेल. त्या बूथचा निकाल ज्यास चुकीचा वाटेल तो पावत्या संकलन करून आयोगामार्फत कोड तपासून शंकानिरसन करू शकेल. संगणकतज्ञांकडून आणखी सुधारणा करून दूरच्या मतदारासही मतदानाची संधी मिळवून देऊ शकतात. हे शक्य नसेल तर बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे. त्यावर मतदाराची सही किंवा अंगठा असावा व त्यावर पट्टी लावावी किंवा ते अदृश्य ठेवणे शक्य आहे. मतदारांना मोबाईलवर मेसेज पाठवून त्याचा केंद्र क्र., यादी, भाग, वॉर्ड क्र. कळवू शकता व ज्याला मेसेज गेला नसेल त्यांनी पुरावे दिल्यास पुरवणी यादीत नावे घेता येतील.