चिरतरुण-MachoMan!!

3

राजेश शृंगारपुरे,[email protected]

 
मिलिंद गुणाजी... पिळदार शरीरयष्टी… उमदे… देखणे व्यक्तिमत्त्व… काय आहे त्यांच्या चिरतारुण्याचे रहस्य?

नमस्कार वाचक हो! मागील सदरात उत्तम प्रतिसाद मिळाला. आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार!

आज तुमची भेट अशा एका अवलियाशी करीत आहे ज्यांनी मॉडेलिंग, मालिका, सिने क्षेत्र अशा तिन्ही स्तरांवर स्वतःचे असे एक वेगळे स्थान निर्माण केले. 90 च्या दशकात सिनेसृष्टीतील पदार्पणाच्या काळातच फिल्मफेअर ऍवॉर्डचे सर्वोत्कृष्ट खलनायकाचे नामांकन पटकावले. कधी लेखक तर कधी भटकंतीकार म्हणून अवतरले. उंच आणि भारदस्त शरीरयष्टी… शांत स्वभाव… आणि परखड व्यक्तिमत्त्व. टेलिव्हीजन असो वा सिनेमाचा मोठा पडदा… ज्यांची करडी नजर नेहमीच कमाल करून गेली. त्यांचा खलनायकी अवतार विशेष छाप पाडतो. असे हे हरहुन्नरी कलाकार म्हणजेच मिलिंद गुणाजी. गेली दोन दशके चिरतरुण दिसणारे मिलिंद दादा आपल्या फिटनेसच्या बाबतीत तितकेच शिस्तप्रिय आहेत. ते आणि त्यांचा फिटनेस यावर आमच्यात जोरदार गप्पा रंगल्या.

व्यायामशाळेची आवड कशी निर्माण झाली…

इंजिनीयरिंग झाल्यावर त्यांनी विशेषतः स्पोर्टसवर लक्ष केंद्रित केले. क्रिकेट आणि बॅडमिंटन. क्रिकेट कोच रामनाथ केणी याच्ंयाकडे क्रिकेटचे धडे घेत थेट अंडर 19 टीममध्ये जागा मिळवली. मात्र यासाठी त्यांच्या क्रिकेटच्या गुरूंची शिकवण कामी आली आणि ती म्हणजे ‘फिटनेस मस्ट’. त्यासाठी त्यांनी पर्यायी खेळ म्हणून बॅडमिंटन रॅकेट हाती सोपविले. या खेळाच्या रूपाने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. शिवाय खासकरून क्रिकेटपटूंसाठी हा खेळ म्हणजे ‘यू कम इन लाइन ऑफ बॉल’ म्हणून प्रॅक्टिसही झाली आणि फिटनेसही राखता आला. विशेष म्हणजे बॅडमिंटन कोच इक्बाल मेहेंद्र जे स्वतः नॅशनल चॅम्पियन होते त्यांच्या छत्रछायेखाली या खेळातही मिलिंददादा निपुण झाले आणि पुढे सेंट्रल ऍथलेटिक्स स्वरूपाचा फिटनेस कमावला. यामध्ये विशेषतः शारीरिक व्यायाम (बॉडी एक्सरसाइज) हा प्रकार मोडतो. त्यामध्ये क्षमता आणि ताकद वाढते. यामध्ये बॉडीबिल्डिंग हा प्रकार नसतो. त्यांच्यासाठी रोजचाच शारीरिक व्यायाम अग्रगण्य होता. त्यामुळे ऐन उमेदीत उंच, देखणे आणि आकर्षक शरीरयष्टी असलेले मिलिंद दादा आपसूकच मॉडलिंगकडे वळले आणि कालांतराने सिनेसृष्टीकडे. प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयातील खलनायक जास्त भावला.

कामाच्या व्यस्त जीवनशैलीतही त्यांनी त्यांचा एक छंद नेहमीच जोपासला आणि तो म्हणजे ट्रेकिंग. ट्रेकिंगमुळे ते नेहमीच फिटनेस फ्रिक राहिले. त्यांचा ‘भटकंती’ हा टीव्ही शो पाहता याची प्रचीतीही आली.
बदलत्या काळानुसार व्यायाम प्रकारात बदल
मिलिंददादा सुरुवातीपासूनच ‘फ्री बॉडी एक्सरसाइज’ हा व्यायाम प्रकार अवलंबित होते. मात्र बदलत्या काळानुसार फिटनेस क्षेत्रात आमूलाग्र बदल घडला. नवी पिढी ‘बॉडीबिल्डिंग’कडे वळली. पिळदार शरीरयष्टी घेऊन नायक पडद्यावर अवतरला. पर्यायाने खलनायकही तितकाच भक्कम असावा ही मानसिकता प्रेक्षकांमध्ये रूजू झाली आणि अर्थातच ‘मागणी तसा पुरवठा’ या तत्त्वानुसार मिलिंददादा यांची पावले जीमकडे वळली. आजही वांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानाजवळील एमआयजी आणि एमसीए क्लबमध्ये जाऊन ते नियमित व्यायाम करतात.

दैनंदिन व्यायाम पद्धत

मिलिंददादांच्या मते चालणे हा उत्तम व्यायाम आहे आणि म्हणूनच ते जीममध्ये एक तास कार्डिओ करतात. तसेच एक-सवाएक तास मस्क्युलर व्यायाम करतात. शरीराच्या प्रत्येक स्नायूसाठी वेगळा व्यायाम. यामध्ये ट्रायसेप, बायसेप, चेस्ट असा वर्कआऊट असतो. एक दिवस अप्पर बॉडी तर एक दिवस लोअर बॉडी असे व्यायाम प्रकाराचे विभाजन करतात. त्यालाच अल्टरनेटिव्ह बॉडी वर्कआऊट असे म्हणतात.

नव्या पिढीच्या नवकलाकारांस मिलिंदोपदेश

प्रादेशिक असो किंवा आंतरराष्ट्रीय सिनेसृष्टीत प्रचंड स्पर्धा आणि संघर्ष आहे. या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर शरीर सुदृढ, आकर्षक आणि निरोगी राहणे गरजेचे आहे. मग तो पुरुष असो किंवा स्त्री. कलाकार हा उठावदार असावाच. व्यायाम आणि आहार याचे योग्य नियोजन तुम्हाला ही गोष्ट साध्य करण्यास नक्कीच मदत करील. मिलिंददादा यांच्या मते आजची पिढी हेल्थ कॉन्शस आहे. ते त्यांच्या मुलातही ही जागरूकता नेहमीच पाहतात. तोही आहार नियोजनावरच लक्ष केंद्रित करीत आहे. नो ड्रींक… नो स्वीट्स, फळे, अंडी, सलाड असा ठरावीक आहार. चिरतरुण वडील लाभल्याचा हा फायदा असे मी संबोधले आणि नेहमीप्रमाणे एक स्मितहास्य मिलिंददादांच्या चेहऱयावर उमटले आणि त्या स्मितहास्यातून मुलाबाबतच्या अभिमानाचे तरंग उमटले.
पुढे फिल्म शूटिंगच्या वेळेनुसार आणि सोयीनुसार व्यायामशैलीत बदल करण्याचा कानमंत्रही त्यांनी दिला. कधी हॉटेलमध्ये जीम असल्यास नेहमीचा व्यायाम होतो. मात्र कधी छोटय़ा फिल्मच्या शूटिंगसाठी छोटय़ा शहरात किंवा गावी मुक्काम होतो. तेथील हॉटेल्समध्ये जीमची सुविधा नसते. अशा वेळी आपल्या रूममध्येच जोर, बैठका हा एक उत्तम व्यायाम ठरतो. शिवाय मूळची फ्री बॉडी एक्सरसाइज ही पद्धत एकदम उपयोगी पडते. जमिनीवर बसून अथवा उभे राहून हा व्यायाम होतो आणि महत्त्वाचे म्हणजे शूटिंगदरम्यान कधी कधी वेळीअवेळी जेवण होते. अशावेळी दुसऱया दिवशी चक्क उपवास पाळावा म्हणजे अल्पोपहार करावा. म्हणजे पोटाचे विकार उद्भवत नाहीत. डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची आहार. नियोजन पद्धती त्यांना खूपच आदर्श वाटते. ज्या पद्धतीत दिवसातून दोनवेळा आहार घेण्याचा सल्ला दिला गेला आहे.

खूप दिवसांनंतर मिलिंददादा यांच्याशी मनसोक्त गप्पांची मैफल जमली. मी फार पूर्वीपासूनच त्यांना पाहात आलो आहे. आजही ते तितकेच रूबाबदार आणि सुदृढ दिसतात. त्यांचे अनुकरण आजच्या तरुण पिढीने करायला हवे. त्यांनी दिलेला कानमंत्र तुमची जीवनशैली सुधारण्यास नक्कीच उपयोगी पडेल. आपला अमूल्य वेळ देऊन व्यायामविषयक इतके स्पष्ट आणि महत्त्वपूर्ण मत मांडल्याबाबत मिलिंद गुणाजी यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

शब्दांचे बंधन लक्षात घेता तूर्तास येथे थांबतो. पुढील भागात अशाच एका नामांकित व्यक्तिमत्त्वाची, त्यांच्या व्यायामविषयक अनुभवाची आरोग्यगाथा सादर करतो.