दरवर्षी 8 लाख लोक आत्महत्या करतात!

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

दरवर्षी जगभरातील सुमारे 8 लाख लोक आत्महत्या करतात. यामध्ये गरीब आणि श्रीमंत अशा दोन्ही वर्गातील आणि सर्व देशांतील आणि धर्मांतील नागरिकांचा समावेश आहे. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ही माहिती दिली आहे.

आत्महत्येमुळे 15 ते 29 वर्षे वयोगटातील युवकांचे सर्वाधिक मृत्यू झालेले आहेत. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱयांचेही प्रमाण लक्षणीय आहे. जर एका व्यक्तीचा आत्महत्येने मृत्यू होत असेल तर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱयांची संख्या 20 इतकी आहे. अल्प आणि मध्यम उत्पन्न देशांतील ग्रामीण कृषीउत्पन्नांवर आधारित प्रदेशातील लोक जीवन संपवण्याचा मार्ग स्वीकारत आहेत. विषप्राशन करणे किवा गळफास लावून सर्वाधिक आत्महत्या होतात.

श्रीमंत देशांमध्ये मानसिक नैराश्येतून आत्महत्या होत असल्याचे आढळून आले आहे. व्यसनांच्या अधीन होऊनही जास्त प्रमाणात जीवन संपवले जात आहे.

लक्षणे वेळीच ओळखा

महिलांपेक्षा पुरुषांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त आहे. आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे काम कुटुंबातील माणसे, मित्रमंडळी आणि सहकारी करू शकतात. सर्वात आधी अशा मानसिक आजाराने त्रस्त व्यक्तीची लक्षणे ओळखता आली पाहिजेत. सतत उदास राहणे, कामात लक्ष न लागणे, भूक मंदावणे, झोप उडणे, मनाची एकाग्रता भंग होणे, मृत्यूचे विचार मनात येणे ही आत्महत्या करू इच्छिणाऱया व्यक्तीची लक्षणे असल्याचे डब्ल्यूएचओच्या अहवालातून सांगण्यात आले आहे. अशा व्यक्तींशी नातेवाईक, मित्रमंडळी आणि सहकाऱयांनी संवाद साधला पाहिजे. मानसोपचार तज्ञांचे उपचार वेळीच मिळाले पाहिजेत.