स्वागत दिवाळी अंकांचे

‘झी’ मराठी उत्सव नात्यांचा

‘झी’मराठीच्या दिवाळी अंकात राजकीय व्यक्ती, कलावंत यांना  वेगळ्या रूपात वाचण्याची संधी वाचकांना मिळणार आहे. प्रत्येकाने स्वतःला एका वेगळ्या क्षेत्रात वाहून घेतलेलं असतं तरीही त्याची एक वेगळी ओढ असते. अशा प्रकारे प्रत्येकाचं त्याच्या आवडीशी असलेलं त्याचं अतूट नातं. या नात्याविषयी विविध मान्यवरांची हृद्गतं वाचकांना आवडतील. ग.दी.माडगूळकर, पु.ल.देशपांडे आणि सुधीर फडके या दिग्गजांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या आठवणी जागवणाऱ्या लेखांचा अंकात समावेश केला आहे. ‘हॅम्लेट’ आणि ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकांविषयीचे लेख, ‘उत्सव लघुकथाकारांचा’ यामध्ये नवीन कथाकारांच्या कथा शिवाय महाराष्ट्रातूनच नाही तर थेट जर्मनीहून आलेल्या लघुकथेसह दहा सर्वोत्तम लघुकथांचा खजिना वाचायला मिळतील. झी मराठीच्या ‘उत्सव नात्यांचा’च्या निमित्ताने वाचकांशी अंकुरलेलं हे नातं या दीपोत्सवाच्या निमित्ताने अधिक दृढ होईल.

संपादक – प्रशांत दळवी

मूल्य – 100 रु., पृष्ठs -240

आहुति

यंदाचा हा दिवाळी अंक इतिहास या विषयावर प्रकाशित झाला आहे. ‘इतिहास का व कसा जपावा’, ‘किल्ल्यातील शहर आणि सत्याग्रह’ आणि ‘गडपुराण’ हे ऐतिहासिक विषय सदाशिव टेटविलकरांनी अतिशय योग्य, साध्यासोप्या पद्धतीने मांडले आहेत. याखेरीज ‘इतिहास भारतीय खगोलशास्त्र्ााचा’ (दा. कृ. सोमण), गडकिल्ल्यांवरील जलव्यवस्थापन’ (प्रवीण कदम), प्राचीन मुंबईचा इतिहास (रवींद्र लाड), लेखापरीक्षणाचा इतिहास (हेमंत गोगटे), भारतीय शेतीचा इतिहास (राजेंद्र भट), ऐतिहासिक अंबरनाथ नगरी (गिरीश त्रिवेदी) आदी सर्वच लेख वाचनीय आहेत.

 संपादक – गिरीश वसंत त्रिवेदी

मूल्य – 200 रु., पृष्ठs – 184

ललित

गंथप्रसार आणि ग्रंथसंग्रह या विषयाला वाहिलेला आणि चोखंदळ वाचकांच्या पसंतीस पडलेला अंक दरवर्षीप्रमाणेच दर्जेदार आहे. राम गणेश गडकरी यांची स्मृतिशताब्दी आणि पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने माधव वझे, रमेश धोंगडे, मीना वैशंपायन, मुकुंद टाकसाळे, विलास खोले, पुष्पलता राजापुरे-तापस आदी मान्यवरांनी दोघांच्या साहित्यिक कामगिरीवर दृष्टिक्षेप टाकला आहे. याखेरीज वसंत आबाजी डहाके, अनंत देशमुख, विजय पाडळकर, चंद्रकांत भोंजाळ, संजीवनी खेर, गणेश विसपुते यांच्या अभ्यासपूर्ण लेखांचा समावेश यात केला आहे. प्रत्येक लेखात विषयाची नेमकी मांडणी हे या अंकाचे बलस्थान आहे. सतीश भावसार यांचे दिवाळी अंकाला साजेसे मुखपृष्ठ!

संपादक – अशोक केशव कोठावळे

मूल्य – 180 रु., पृष्ठs – 210

राम प्रहर शब्दोत्सव

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मिशन 2019’ अंतर्गत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण तथा सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या मुलाखती हे यंदाच्या अंकाचे खास वैशिष्टय़ आहे. जीवनाचं भावविश्व उलगडणारा कथाविष्कार हेसुद्धा या अंकाचे वेगळेपण आहे. मिथिला सुभाष, उमाजी केळुसकर, रोहिदास पोटे, धनंजय गोंधळी, पी. ए. अत्तार, डॉ. अविनाश पाटील आदी मान्यवरांच्या दर्जेदार कथांचा समावेश यात आहे. ‘रायगड जिल्हा – काल, आज आणि उद्या’ या विशेष विभागातील लेख वाचनीय आहेत. याखेरीज कविता, व्यंगचित्र, राशीविशेष यांचाही समावेश आहे. किल्ले रायगडचे देखणे मुखपृष्ठ लक्षवेधी आहे.

संपादक – देवदास मटाले

मूल्य – 75 रु., पृष्ठs – 152

विवेक

या अंकात रमेश पतंगे यांनी राज्यघटनेचे भारतीय आत्मतत्त्व सहजसोप्या शैलीत उलगडले आहे. तर दिलीप करंबेळकर यांनी हिंदुस्थानी व पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील भेद आणि साम्य दाखवतानाच जगण्यासाठी या दोहोंतील विचारांची सांगड कशी घालायची याबाबत विवेचन केले आहे. इस्लामी संस्कृतीचा विधायकतेकडून विध्वंसाकडे कसा प्रवास झाला याची अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. ‘शेती, शेतकरी आणि बदललेलं वास्तव’ या परिसंवादात मान्यवरांनी केलेलं भाष्य विचारमंथन करणारे आहे. ‘साडी’ या वस्त्र्ााची प्रदेशानुसार बदलणारी वैशिष्टय़ शेफाली वैद्य यांनी लालित्यपूर्ण शैलीत माहिती करून दिली आहे. सॉफ्टवेअरमधून उकललेली गीता, त्यातून उभं राहिलेलं काम याची माहिती धनश्री बेडेकर यांच्या लेखातून मिळते. त्याचबरोबर शॉर्टफिल्म्सच्या जगाची माहिती देणारा किरण क्षीरसागर यांचा लेख तंत्रज्ञानाच्या गतीची जाणीव करून देणारा इंद्रनील पोळ यांचा लेख अंकाच्या समृद्धतेत भर घालणारे.

कार्यकारी संपादक – अश्विनी मयेकर

मूल्य – 200 रु., पृष्ठs – 490

आश्लेषा

‘आश्लेषा’ दिवाळी अंकातून यंदाही अनुवादित कथा, ललित लेख, कविता तसेच वरकमाई, कस्तुरीगंध, परिसस्पर्श या कथा, मानसिक आरोग्य, डिजिटल पालकत्व, इस्पितळ केव्हा गाठावे असे डॉ. स्वाती सुपे, डॉ. शीतल बीडकर, डॉ. मिलिंद शेजवळ या मान्यवर डॉक्टरांचे लेख, याशिवाय मृणाल कुलकर्णी, सरस्वती कुवळेकर, अरुण मळेकर, उज्जल निरगुडकर, राजन पाटील यांचे विविध विषयांवरील वाचनीय लेख, बालकथा, व्यंगचित्रे, व्यक्तिचित्रे आणि मीनल मोहाडीकर आणि सोनाली लोहार या समाजात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या महिलांच्या मुलाखती, वार्षिक राशीभविष्य  यामुळे अंक सजला आहे.

संपादक – अशोक तावडे

मूल्य – 175 रु., पृष्ठs – 218

साप्ताहिक युगांतर दिवाळी अंक

जनमानसाला रोखठोक सवाल करणारा ‘बने जब यहाँ हिंदू-मुसलमाँ इन्सा’ हा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा लेख, एरवी सर्वसामान्य वाटणारी माणसे व्हॉटस्ऍप, फेसबुक, ट्विटर या माध्यमातून अचानक हिंस्र, कर्मठ, अतर्क्य, अनैतिहासिक, अवैज्ञानिक बेलाशक का होऊ लागली आहेत? या प्रश्नांचा शोध घेणारा ज्येष्ठ माध्यम तज्ञ जयदेव डोळे यांचा ‘नाही नॉर्मल मन, काय करील साधन’ हा लेख वाचनीय आहे. तसेच भाजप, काँग्रेस या पक्षांनी मतांसाठी मुस्लिमांचा कसा वापर केला आणि त्यातून खरंच मुस्लिमांचा उत्कर्ष झाला का? या प्रश्नांचा ऊहापोह करणारा ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचा लेख वाचकांना वाचायला मिळतील. संजीव चांदोरकर आणि प्रा. श्रीनिवास खांदेवाले यांनी आजच्या आर्थिक व्यवहाराचे प्रश्न मांडले आहेत, तर रमेश पाध्ये यांनी शेतकरी आणि ग्राहक यांच्या प्रश्नांचा ऊहापोह आपल्या लेखातून केलाय.

संपादक – डॉ. भालचंद्र कानगो

मूल्य – 250 रु., पृष्ठs – 282

शब्द दर्वळ

इंडोनेशियातील हिंदू प्रभाग म्हणजे बाली हे बेट. या देशाची संस्कृती नाटय़, नृत्य याभोवती विणली आहे. यातील आणखी पैलू उलगडून दाखविणारा डॉ. उर्मिला चाकूरकर यांचा माहितीपूर्ण लेख, ‘देवराईंचे जनविज्ञान’ याबाबत विस्तृत माहिती देणारा डॉ. प्रमोद पाठक यांचा लेख वाचनीय आहे. स्त्र्ायांच्या जगण्याचा आढावा घेणारा डॉ. छाया महाजन यांचा ‘अस्ताचलावर’ हा लेख विचारप्रवृत्त करणारा. ‘पाशवी पाकिस्तानचा तेजोभंग’ या लेखात अब्दुल कादर मुकादम यांनी बांगलादेशच्या युद्धात झालेल्या पाकिस्तानी पराभवाचे विस्तृत विश्लेषण केले आहे. ‘अंतरीच्या गूढगर्भी’ हे मान्यवरांच्या कवितांचे समृद्ध दालन या अंकात आहे.

संपादक – श्रीकृष्ण बेडेकर

मूल्य – 200 रु., पृष्ठs – 148