धक्कादायक : सैन्यातून निवृत्त होऊन तस्करांसाठी दुरुस्त केल्या AK 47


सामना ऑनलाईन । मुंगेर

बिहार पोलिसांनी देशातंर्गत हत्यारांची तस्करी करणार्‍या टोळीला पकडले आहे. ही टोळी मध्य प्रदेशच्या जबलपूरमधल्या हत्यारांच्या भांडारातून खराब झालेल्या AK 47 चोरत असेत. त्यानंतर एका निवृत्त सैनिकाकडे विकत. निवृत्त सैनिक या रायफल दुरुस्त करून मुंगेरच्या हत्यार तस्करांना विकत असे. या मोबदल्यात या निवृत्त सैनिकास 4.5 ते 5 लाख रुपये मिळत. या तस्करांनी आतापर्यंत 70 AK 47 दहशतवादी आणि नक्षलवाद्यांना विकली आहे. पोलिसांनी या संबंधी अनेकांना अटक केली असून 3 AK 47 व इतर हत्यारे जप्त केली आहेत.

मुंगेरच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 30 ऑगस्ट रोजी जमालपूरध्य त्यांनी एका व्यक्तीला अटक केली. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव इम्रान असून त्याच्याकडे तीन AK 47 रायफल आढळल्या होत्या. मध्य प्रदेशच्या पुरुषोत्तम लाल रजक या व्यक्तीने ही रायफला त्याला विकल्याचे त्यांनी सांगितले.

बिहार पोलिसांनी याची माहिती मध्य प्रदेश पोलिसांना दिली. तेव्हा मध्य प्रदेश पोलिसांनी पुरुषोत्तम लाल, त्याची पत्नी चंद्रावती देवी आणि मुलगा शीलेंद्र या तिघांना अटक केली. पोलिसांनी पुरुषोत्तम कडून पाच काडतूस, रायफल दुरुस्तीचे साधनं, सहा लाख रुपये आणि दोन गाड्या जप्त केल्या आहेत.

आरोपी पुरुषोत्तम लाल 506 आर्मी बेस वर्कशॉपमध्ये कार्यरत होता. तिथे तो AK 47 दुरुस्त करण्याचे काम करत. 2008 साली निवृत्त झाल्यानंतर पुरुषोत्तमने आपल्या मुंगेरचा सहकर्मचारी हसनच्या माध्यमातून इम्रानशी संपर्क साधला.

पुरुषोत्तम लाल ने संरक्षण मंत्रालयातील सुरेश ठाकूरची मदत घेतली होती. सुरेशकडे खराब झालेल्या AK 47 आणि इतर हत्यारांच्या गोदामाची जबाबदारी होती. सुरेश ठाकूर पुरुषोत्तमला खराब झालेल्या AK 47 आणि त्याचे भाग देत असत. पुरुषोत्तम या खराब झालेल्या AK 47 दुरुस्त करून देत असत. एका रायफल मागे त्याला ४.५ ते ५ लाख रुपये मिळत असे.

अशा प्रकारे पुरुषोत्तमने लाखोची संपत्ती गोळा केली होती. पोलिसांना त्याच्या घरी मोठ्या प्रमाणात पैसे, जिवंत काडतूस, रायफल दुरुस्त करण्याची साधने, गाड्या आणि महागड्या दारूंच्या बाटल्या सापडल्या. सदर घटनेची सूचना एनआय, आयनी आणि एटीएसला देण्यात आली आहे.