माजी पोलीस अधिकाऱ्याचे मत भलत्यालाच गेले, कारवाईच्या भीतीने तक्रार करण्यास नकार

सामना ऑनलाईन, गुवाहाटी

Lok Sabha election 2019 लोकसभेच्या निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवारी पार पडले. आसाममध्येही मतदान पार पडले असून यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आसामचे माजी पोलीस महासंचालक यांच्यासोबत हा प्रकार घडल्याने घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे. माजी पोलीस महासंचालक हरेकृष्ण डेका यांनी सांगितले की त्यांनी ज्या उमेदवाराला मत दिले होते त्या उमेदवाराला मत दिल्याची व्हीव्हीपॅटमधून पावती आली नाही. व्हीव्हीपॅटमधील पावतीवर त्यांचे मत दुसऱ्याच उमेदवाराच्या नावावर गेल्याचे त्यांना दिसले.

डेका यांनी या घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार करणार नसल्याने सांगितले आहे. तक्रार खोटी निघाली तर तक्रारदाराविरूद्धच कारवाई होते यामुळे आपण या प्रकाराबाबत तक्रार करणार नसल्याचं डेका यांनी सांगितले. डेका यांनी बुधवारी फेसबुकवर एक पोस्ट अपलोड केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की त्यांनी आत्तापर्यंत सातत्याने ‘ईव्हीएम मशिनच्या वापराचा पुरस्कार केला होता, मात्र कालच्या घटनेनंतर माझं मत बदललं आहे’. ईव्हीएम प्रमाणेच गडबडीबाबत तक्रार करणाऱ्याची तक्रार खोटी ठरल्यास केल्या जाणाऱ्या कारवाईबाबतही चिंता व्यक्त केली आहे. अशा कारवाईमुळे तक्रार करायला कोणी पुढे येईल का अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.

यापूर्वी विरोधकांनी अनेकदा ईव्हीएम मशिनसोबत छेडछाड केली जाऊ शकते असा आरोप केला आहे. मात्र तो सिद्ध होऊ शकलेला नाहीये. मंगळवारी मुंबईमध्ये विरोधकांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ईव्हीएम मशिन ही रशियावरून नियंत्रित केली जात असल्याचा आरोप केला होता.