डॉ. दौलतराव आहेर कॉलेजमधील कर्मचारी बडतर्फ; कॉलेज प्रशासनाचा भ्रष्टाचार उघडकीस

3

सामना प्रतिनिधी । कराड

बनवडी (ता. कराड) येथील जी. के. गुजर चॅरीटेबल ट्रस्टचे डॉ. दौलतराव आहेर कॉलेज ऑफ इंजिनीरिंगमधील काही कर्मचाऱ्यांना कॉलेज प्रशासनाने गेल्या सहा महिन्यांपूर्वी तडकाफडकी बडतर्फ केले. बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांनी कॉलेज प्रशासनाचा चाललेला मनमानी कारभार समोर आणून सुरु असलेला भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

कराड येथील शासकीय विश्रामगृहात कर्मचाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन कॉलेज प्रशासन करत असलेल्या घोटाळ्याचा पुराव्यासहित पाढाच वाचला. पोलीस प्रशासनानेही कर्मचाऱ्यांच्या तक्रारी घेण्यास टाळाटाळ केली आहे. न्यायासाठी कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली असून टीएएफएनएएफ संघटनेच्या माध्यमातून लढा उभारला आहे. त्यामुळे जीवितास धोका निर्माण झाला असल्याची भीती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. संगणक विभागाच्या शिक्षिका भाग्यशाला अर्जुन जाधव तर तांत्रिक विभागाच्या गणेश निवृत्ती साळुंखे, फिरोज आलमशाह शिकलगार, उमेश रघुनाथ पवार, विजय पोपट पवार आणि यशवंत आनंदराव काकडे अशा एकूण सहा कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले असून आतापर्यंत 30 ते 40 कर्मचाऱ्यांना याचा सामना करावा लागला आहे. कॉलेज प्रशासनाकडून सेवेतील सहा कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता, अधिकाराचा गैरवापर करून बेकायदेशीर तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले आहे. डेव्हलपमेंटच्या नावाखाली कर्मचाऱ्यांकडून दीड-दोन लाख रुपये रक्कम उकळली असून बडतर्फ कर्मचाऱ्यांना ती रक्कम परत केली गेली नाही. शासकीय नियमानुसार वेतन न देता, कॉलेज प्रशासनाने परस्पर कर्मचाऱ्यांच्या खात्यातील रक्कम काढली आहे. तसेच पगाराचा अतिरिक्त खर्च दाखवून शासनाकडून विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती बळकावली आहे. त्यातूनच विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शैक्षणिक फी वसूल केली जात आहे. कर्मचाऱ्यांना दमदाटी करून बँक खात्याचे कोरे चेक घेण्यात आले आहेत.

कॉलेजच्या इमारतींचे बांधकामही अनधिकृत आणि मुंबई शैक्षणिक कायद्याचे उलंघन करून करण्यात आले आहे. तंत्र शिक्षण संचालनालयाकडे खोटी कागदपत्रे सादर करून विविध कोर्सना मंजूरी घेण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या रजा कॉलेज प्रशासनाकडून दिल्या जात नाहीत. त्याचप्रमाणे पीएफची रक्कमही अनियमित भरली जात आहे. तरी अशा प्रकारचे असंख्य घोटाळे करून कॉलेज शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्यासह कॉलेज प्रशासन सरकारचीची फसवणूक करत असल्याचा आरोप कर्मचार्यांनी केला आहे. बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना कॉलेज प्रशासनाने पुन्हा सेवेत रुजू करून घ्यावे. त्यांना शासनाच्या नियमानुसार सर्व सुविधा देण्यात याव्यात आणि सुरु असलेला भ्रष्टाचार थांबवावा, अशी मागणी टीएएफएनएएफ संघटनेचे सदस्य योगेश ढगे यांनी केली आहे. अन्यथा हा लढा सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.