माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन

3

सामना प्रतिनिधी । सातारा

साताऱ्याचे माजी खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव पाटील यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे वाई तालुक्यासह जिल्ह्यात शोक व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आधी त्यांच्यावर सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईच्या जसलोक रुग्णालयात हलवण्यात आले. तेथेच आज त्यांची प्राणज्योत मालवली.

लक्ष्मणराव पाटील हे 1960 साली ते बोपेगावचे सरपंच झाले. वाई पंचायत समिती सभापती म्हणून त्यांनी 10 वर्षे यशस्वीपणे काम केले. सन 1980 साली लक्ष्मणतात्या जिल्हापरिषदेवर निवडून गेले होते. त्यांनी सलग ११ वर्षे जिल्हा परिषदेचा गाडा समर्थपणे हाकला होता. सन 1999 साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले जिल्हाध्यक्ष झाले. 2004 मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले होते.