एक्झिट पोल म्हणजे नौटंकी, शरद पवार यांची टीका

89

सामना प्रतिनिधी । मुंबई

देशातल्या टीव्ही चॅनेलवर रविवार संध्याकाळपासून सुरू असलेले एक्झिट पोल हे नौटंकी असून लोकसभा निवडणुकीचे खरे निकाल दोन दिवसांतच स्पष्ट होतील अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज एक्झिट पोलवर टीका केली. देशातील काही मीडिया भाजपच्या हातातील बाहुले झाले आहे. पण कोणत्या विचाराचे सरकार देशात सत्तेवर येईल ते लवकरच समजेल, असेही शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संध्याकाळी इस्लाम जिमखान्यात रमजाननिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. त्यावेळी शरद पवार म्हणाले की, कालपासून मीडियाच्या माध्यमातून एक वेगळे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एक्झिट पोल दाखवण्यास सुरुवात केल्यावर अनेकांनी मला फोन करून चिंता व्यक्त केली. काही मीडिया सत्ताधारी भाजपच्या हातातील बाहुल्या झाल्या आहेत. पण चिंता करण्याचे कारण नाही. कारण दोनच दिवसांत देशात सरकार कोणाचे येईल हे स्पष्ट होईल.

ज्यांच्या हातात सरकार, ते हिमालयात बसतात!

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे हे सरकारचे काम आहे, पण ज्यांच्या हातात देशाचे सरकार आहे तेच राजधानी सोडून हिमालयात जाऊन बसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमालयात जाऊन बसणे हा ढोंगीपणा आहे अशा शब्दांत पवार यांनी मोदींच्या ध्यानधारणेचा समाचार घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या