गुंगीचे औषध देऊन मांत्रिकाचा १२० महिलांवर बलात्कार, व्हिडीओही व्हायरल

सामना ऑनलाईन । हिसार

गुंगीचे औषध देऊन तब्बल १२० महिलांवर एका मांत्रिकाने बलात्कार केल्याची घटना हरयाणात घडली आहे. या मांत्रिकाने केलेल्या बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.

अमरपुरी उर्फ बिल्लू असं या मांत्रिकाचं नाव असून हरयाणा येथील फतेहाबादमधील बालकनाथ मंदिराचा पुजारी आहे. एका व्हायरल व्हिडीओमध्ये अमरपुरी बलात्कार करत असल्याचं दिसल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. त्याला अटक केल्यानंतर त्याच्या घराची तपासणी करण्यात आली. तिथे तब्बल १२० महिलांवर बलात्कार केल्याचे व्हिडीओ पोलिसांना सापडले. तसंच गुंगी आणणाऱ्या गोळ्या आणि तंत्र-मंत्राचं सामानही सापडलं. पोलिसांनी त्यावरून त्याची चौकशी केली असता त्याने आपण १२० महिलांवर बलात्कार केल्याचं कबूल केलं.

अमरपुरीला संमोहन विद्या अवगत होती. त्यामुळे तो महिलांना संमोहित करून आपल्या घरी घेऊन जात असे. तिथे तंत्र-मंत्राच्या आड त्यांना गुंगीच्या गोळ्या खायला देत असे. त्यानंतर महिलांवर बलात्कार करून त्यांचा व्हिडीओ बनवत असे. त्यासाठी तो त्याच्या घरातील गुप्त खोलीत त्यांना घेऊन जात असे. तिथे समाधीसदृश जागा त्याने बनवली होती. तिथेच त्याने कॅमेरा बसवला होता. व्हिडीओ बनवल्याची धमकी देत अमरपुरी महिलांकडून पैसे उकळत असे, तसंच त्यांच्यावर पुन्हा बलात्कारही करत असे.

अमरपुरी याचं खरं नाव अमरवीर असून तो मूळचा पंजाब येथील मानसाचा रहिवासी आहे. २० वर्षांपूर्वी तो फतेहाबाद येथे आला होता. त्यानंतर त्याने काही वर्षं जिलेबी बनवण्याच्या व्यवसायही केला होता. काही वर्षांपूर्वी पत्नीच्या निधनानंतर तो मांत्रिक बनला होता. पोलिसांनी या प्रकरणी दोन महिला आणि एका पुरुषालाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी न्यायालयाने अमरपुरीला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मांत्रिकाच्या अत्याचारांना बळी पडलेल्या महिलांना गोपनीयतेच्या विश्वासासह पोलिसांनी समोर येण्याचं आवाहन केलं आहे.