‘जवानी’पायी ‘दिवानी’ झालेल्या डॉक्टरला मांत्रिकाने लावला २ कोटींचा चुना

सर्वसामान्य लोक मांत्रिकाच्या जाळ्यात अडकून फसवले गेल्याची अनेक उदाहरणं आहेत. पण, उत्तर प्रदेशमध्ये मांत्रिकाने चक्क एका डॉक्टर महिलेला 2 कोटींना लुबाडल्याची घटना घडली आहे. तारुण्य परत मिळवून देतो, सोनं दुप्पट करून देतो अशा भूलथापा देऊन या मांत्रिकाने तिच्याकडून पैसे आणि सोनं वसूल केलं आहे.

गाझियाबाद येथील मुरादनगर येथे डॉ. अनिता  ( खरी ओळख कळू नये यासाठी बदलेले नाव)  यांचा दवाखाना आहे. गेल्या वीस वर्षांपासून त्या तिथे प्रॅक्टिस करत आहेत. एक दिवस त्यांच्या दवाखान्यात एक जोडपं उपचारांसाठी आलं. त्या जोडप्यातील पुरुषाने आपण मांत्रिक आहोत आणि काळ्या जादूच्या साहाय्याने तारुण्य परत मिळवून देतो, सोनं दुप्पट करून देतो आणि मुलाला नोकरीही मिळवून देतो, असं अनिता यांना सांगितलं. घटस्फोटिता असलेल्या अनिता वैयक्तिक आयुष्यात त्रस्त होत्या. त्यामुळे त्याच्या भूलथापांना बळी पडून अनिता यांनी सुमारे 65 लाख रोकड आणि दीड किलो सोने-चांदी मांत्रिकाच्या हवाली केली. जवळपास सात वर्षांत मांत्रिकाने अनिता यांच्याकडून 26 वेळा पैसे आणि सोनं-चांदी उकळली होती.

मात्र, इतका काळ लोटूनही परिस्थितीत बदल न झाल्यामुळे अनिता यांनी मांत्रिकाकडे पैसे परत मागायला सुरुवात केली. त्यानंतर मांत्रिकाने त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. मार्च 2018 मध्ये डॉक्टर अनिता यांनी या तांत्रिकाविरोधात तक्रार नोंदवली होती. उच्चशिक्षित असूनही ही महिला तांत्रिकाच्या भूलथापांना कशी बळी पडली हा प्रश्न पोलिसांसह अनेकांना पडला होता.