ठाकूर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची पिळवणूक, 60 टक्के हजेरी असलेल्या विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये मज्जाव

84

सामना प्रतिनिधी, मुंबई

कांदिवली येथील ठाकूर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज महाविद्यालयात मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऑप्लिकेशन (एमसीए) अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त 60 टक्के हजेरी असल्याच्या कारणास्तव कॅम्पस प्लेसमेंटमध्ये बसण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे नामांकित कंपन्यांमधील नोकरीपासून वंचित राहिल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. प्लेसमेंटमधील मुलाखतीसाठी ठरावीक दुकानातूनच कपडे घेण्याची सक्तीही करण्यात आली. विद्यार्थ्यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

ठाकूर महाविद्यालयात एमसीएच्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंट आयोजित केले जाते. त्यात नामांकित कंपन्या सहभागी होऊन विद्यार्थ्यांना नोकरीच्या ऑफर्स देतात. यंदा महाविद्यालयाने अनेक विद्यार्थ्यांना त्यात सहभागी होण्यास मनाई केली. याशिवाय प्लेसमेंटसाठी ठरावीक दुकानातूनच 4600 रुपये किमतीचे सूटे, शर्ट आणि टाय घेण्याची सक्ती केली गेली. इतकेच नव्हे तर वेगवेगळ्या उपक्रमाच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून पैसे उकळले जातात. करीयरशी संबंधित नसलेले अभ्यासक्रमही अतिरिक्त शुल्क आकारून त्यांच्यावर लादले जातात असा आरोप विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर केला आहे. या सर्व प्रकाराला महाविद्यालयाच्या संचालक डॉ. गायकवाड या जबाबदार असल्याचा त्यांचा आरोप आहे.

आपली प्रतिक्रिया द्या