हाफीज सईदच्या पक्षाचे फेसबुक अकाऊंट डिलिट

सामना ऑनलाईन, इस्लामाबाद

पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत उतरलेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदला फेसबुकने दणका दिला आहे. पाकिस्तानात २५ जुलैला होणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर फेसबुकने सईदच्या पक्ष मिली मुस्लिम लीगचे (एमएमएल) आणि उमेदवारांची असंख्य अकौंट आणि पक्षाची पेजेस फेसबुक पेज डिलीट केली आहेत. एमएमएलने याची पुष्टी केली आहे. फेसबुकने एमएमएल पक्षासह त्यांच्या उमेदवारांचे आणि त्यांच्याशी संबंधित पेज डिलीट केले आहेत. फेसबुकने पेज डिलीट करण्यामागची कारणे स्पष्ट केली नसल्याचे एमएमएलने सांगितले. सईदची संघटना जमात उद दावाच्या एमएमएलला निवडणुका लढवण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर एमएमएलने ‘अल्लाह ओ अकबर तहरीक’ या पक्षाच्या नावाने उमेदवार निवडणुकीत उतरवले आहेत. पाकिस्तानात होणाऱया २५ जुलैच्या सार्वत्रिक निवडणुकीत फेसबुकचा गैरवापर होऊ नये यासाठी फेसबुकने सुरक्षेत वाढ केली आहे.