हिंदुस्थानमधीन निवडणुकांत फेसबुकचा गैरवापर होणार नाही- झुकेरबर्ग

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

हिंदुस्थानसह जगभरात होणाऱ्या निवडणुकात डेटासंदर्भातील विश्वासर्हता जपण्याबाबत फेसबुक कटिबद्ध असल्याचे कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी स्पष्ट केले आहे. केंब्रिज अॅनालिटीका या ब्रिटीश फर्मने २०१६ मध्ये अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत फेसबुकवरील ५ कोटी युझर्सचा डेटा चोरल्याचे उघड झाले आहे. ही माहिती उघड झाल्यानंतर झुकरबर्ग यांनी प्रथमच आपले मौन सोडले आहे. ‘सीएनएन’ या अमेरिकी न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये झुकेरबर्गने या विषयावरची आपली बाजू मांडली.

हिंदुस्थानातील निवडणुकांबाबत विचारलं असता झुकेरबर्ग म्हणाला की, ‘जगातील अनेक देशांमध्ये येत्या काळात निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांमध्ये बाहेरील गोष्टींचा प्रभाव पडू नये, यासाठी योग्य खबरदारी घेण्याच्या दृष्टी खबरदारी घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हिंदुस्थानात पुढच्या वर्षी मोठ्या निवडणुका पार पडणार आहेत, ब्राझिलमध्येही निवडणूक आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये महत्वाच्या निवडणुका पार पडणार असून या निवडणुकांमध्ये फेसबूकचा दुरुपयोग होणार नाही ही आमची जबाबदारी असून यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करु’, असं मार्क झुकेरबर्गने सांगितलं आहे. झुकेरबर्गने फेसबुकवर पोस्ट लिहित म्हटलं की, आमच्या हातून काही चुका झाल्या आहेत. या चुका सुधारण्यासाठी आम्ही योग्य पावलं उचलली आहेत.

काय आहे प्रकरण?
‘फेसबुक’वरील पाच कोटी नागरिकांची तपशीलवार माहिती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी ‘केम्ब्रिज ऍनालिटिका’ या कंपनीला पुरवल्याबद्दल ‘फेसबुक’चे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांना ब्रिटनच्या संसदीय समितीने समन्स बजावले होते. ब्रिटनच्या माहिती आयुक्त एलिझाबेथ डेन्हम यांनी कंपनीच्या सर्च वॉरंटसाठी न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले होते. त्यापाठोपाठ ब्रिटनच्या संसदीय समितीने मार्क झुकेरबर्ग यांना समन्स बजावले आहे.