…तर फेसबुकसाठी भरावे लागणार पैसे

सामना ऑनलाईन । मुंबई

फेसबुक सध्याच्या युगातील संवादाचं प्रभावी माध्यम आहे. फेसबुकवरुन मेसेज, फोटो, व्हिडीओ अशा अनेक माध्यमातून एकमेकांशी संवाद साधता येतो. फेसबुक फ्री असल्याने अनेकजण त्याचा पुरेपूर वापर करुन घेतात. मात्र जर फेसबुक वापण्यासाठी पैसे भरावे लागले तर… तसं होणार नाही कारण फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी फेसबूक नेहमी फ्री राहील, असं काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं आहे. यासोबतच फेसबुकचं पेड व्हर्जनही लॉन्च केलं जाऊ शकतं असंही त्यांनी सांगितले.

ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, फेसबुक एक सबस्क्रिप्शन बेस्ड मॉडलवर संशोधन करत आहे. यामुळे युजर्स आपल्या प्रायव्हसीसाठी किती पैसे खर्च करण्यासाठी तयार होऊ शकतात याची माहिती उपलब्ध होईल. गेल्या काही दिवसांपासून फेसबुकच्या सबस्क्रिप्शन बेस्ड मॉडलबाबत अनेक चर्चा होत आहेत. यामध्ये युजर्सला फेसबुकला पेसै देऊन आपल्या प्रायव्हसीची सुरक्षेची हमी मिळू शकेल.

फेसबुक डेटा लिक प्रकरणानंतर कंपनी सध्या दबावाखाली आहे. डेटा लिक प्रकरणानंतर मार्क झुकेरबर्ग यांना अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी अमेरिकेच्या सिनेटमध्ये हजर राहावं लागलं होतं. तेथेही त्यांना सिनेट सदस्यांनी फेसबुकच्या अॅड फ्री व्हर्जन बाबत विचारणा केली होती, जो पेड असण्याची शक्यता आहे. यावर उत्तर देतांना झुकेरबर्ग यांनी स्पष्ट केलं होतं की, फेसबुकचं फ्री व्हर्जन नेहमी अस्तित्वात राहील, मात्र पेड व्हर्जन सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे.