फेसबुकचा यूजर डाटा एअरटेल आणि सावनशी शेअर

15

अमेरिकन काँग्रेसने विचारलेल्या प्रश्नांच्या लेखी उत्तरांनी फेसबुकच्या अडचणीत अजूनच भर पडत चालली आहे. या उत्तरांद्वारे फेसबुकने अनेक शंकांचे खुलासे केले असून त्यामुळे अनेक नव्या नव्या गोष्टी उघडकीला येत आहेत आणि त्यामुळे फेसबुकने काय काय काळ्या कारवाया केल्या आहेत हेदेखील समोर येत आहे. अमेरिकन काँग्रेसच्या एका प्रश्नाला उत्तर देताना फेसबुकने आपला यूजर्स डाटा कोणा कोणाबरोबर शेअर केला त्या कंपन्यांच्या नावाचा खुलासा केला आहे. या कंपन्यांमध्ये एअरटेल आणि म्युझिक ऍप सावन यांचादेखील समावेश आहे. अर्थात या कंपन्यांना या डाटाची वैयक्तिक वापरासाठी कोणतीही परवानगी नव्हती असा खुलासादेखील फेसबुकने दिला आहे. या कंपन्यांना या डाटाच्या वैयक्तिक वापरासाठी यूजर्सची परवानगी आवश्यक होती असे पुढे फेसबुकने म्हटले आहे. या यूजर्स डाटामध्ये सर्च मेटा डाटा, यूजर्सचे लोकेशन, बिहेव्हियर असे सर्व काही समाविष्ट होते. चिंतेची गोष्ट म्हणजे यूजर्सनी आपली जेवढी माहिती फेसबुकवर दिली असेल त्यापेक्षाही यूजर्सची अधिक वैयक्तिक माहिती फेसबुकने डाटा म्हणून गोळा केलेली आहे. फेसबुक फक्त यूजर्सने दिलेल्या माहितीवरच समाधानी नसते तर ते यूजर्सच्या डिव्हाईसमधून स्वतःदेखील माहिती गोळा करत असते हे या आधीच समोर आलेले आहे. त्यामुळे यूजर्सने फेसबुकशी शेअर न करताही त्याचे ई-मेल आयडी, मित्रांची वैयक्तिक माहिती असे सगळेच गोळा होते. अर्थात यासाठी यूजरने यूजर ऍग्रीमेंटला मान्यता द्यायला हवी असते, मात्र अनेकजण हे ऍग्रीमेंट न वाचताच ‘ऍग्री’वर क्लिक करून मोकळे होत असतात. एअरटेलने २०१० साली आपल्याला ऍप डेव्हलपर म्हणून असे ऍसेस मिळाल्याचे मान्य केले आहे. मात्र २०१३ सालीच हा प्रोजेक्ट संपला आणि डाटाचा ऍसेसदेखील बंद झाल्याचे नमूद केले आहे. एअरटेल यूजर्सच्या वैयक्तिक माहितीचा कधीच दुरुपयोग करत नसल्याचे एअरटेलने स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या