वेब न्यूज : फेसबुकची यू टय़ूबला टक्कर

1

>> स्पायडरमॅन

फेसबुक आणि गुगल या दोन कंपन्यांमधील द्वंद्व तसे पुरातन म्हणावे असेच. आधी फेसबुकने गुगलच्या ऑर्कुटसारख्या प्रचंड लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला जेरीस आणले आणि आता फेसबुक गुगलच्याच यू टय़ूब या जगप्रसिद्ध ऑनलाइन व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवेच्या मागे लागले आहे. यू टय़ूबला आव्हान म्हणून फेसबुक लवकरच आपली वॉच व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवा सुरू करते आहे. खरे तर ही सेवा गेल्या वर्षीच अमेरिकेत सुरू करण्यात आली आहे, मात्र आता ती जगभरातील यूजर्सला पुरविण्यात येणार आहे. या फेसबुकच्या नव्या व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवेच्या प्लॅटफॉर्मवरती व्हिडीओ तर शेअर करता येणार आहेतच, पण फेसबुकच्या न्यूज फीडमध्ये सेव्ह केलेल्या व्हिडीओ क्लिप्सदेखील इथे बघण्याची सोय असणार आहे. जगातले नवे नवे ब्रॅण्डस्, कलाकार यांना घेऊन फेसबुक हा धमाका करते आहे. इथे ज्या व्हिडीओला जास्तीत जास्त दर्शक मिळतील त्या व्हिडीओला जाहिरातीदेखील मिळणार आहेत. या जाहिरातींमधून मिळणारे उत्पन्न सदर व्हिडीओचा निर्माता आणि फेसबुक यांच्यामध्ये 55%, 45% असे वाटले जाणार आहे. सध्या तरी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, न्यूझीलंड आणि ब्रिटन या देशांतील यूजर्सलाच या जाहिरात सेवेचा लाभ मिळणार असला तरी लवकरच जगभरच्या यूजर्सना तो मिळण्यास सुरू होणार आहे. फेसबुक या सेवेसाठी स्वतःचे असे काही खास शो घेऊन येणार आहेच, पण त्या जोडीला व्हॉइस, फॉक्स न्यूज, बझफीड, एबीसीनेदेखील आपल्या सेवेसाठी इथे प्रोग्रॅम बनवल्याची बातमी आहे. जोडीलाच जेडा पिंकेट स्मिथचा टॉक शो ‘रेडटेबल टॉक’, बेयर ग्रिल्स होस्ट करत असलेला रिऑलिटी शो ‘फेस द वाइल्ड’ आणि एलिझाबेथ ओल्सेनचा ‘सॉरी फॉर योर लॉस’ असे आकर्षक शोदेखील असणार आहेत. या फेसबुकच्या सेवेला यू टय़ूबची प्रतिस्पर्धी मानले जात असले तरी ही सेवा टीव्ही चॅनेल्सच नव्हे तर ऍमेझॉन व्हिडीओ, बीबीसी आयप्लेयर, इन्स्टाग्राम टीव्ही आणि नेटफ्लिक्सलादेखील जोरदार टक्कर देईल असा विश्वास तज्ञ व्यक्त करत आहेत.