बिहारींनी महाराष्ट्र सोडल्यास राज्यातील कारखानेच बंद होतील – सुशीलकुमार मोदी

1

सामना प्रतिनिधी । नागपूर

महाराष्ट्र राज्यातील अनेक कारखाने केवळ बिहारी मजुरांच्या भरवशावर सुरू आहेत. बिहारी मजूर महाराष्ट्रातून गेले तर या राज्यातील कारखानेच बंद होतील, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते व बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी शुक्रवारी नागपुरात केला. पैसा कमविण्यासाठी बिहारी लोक चंद्रावरही जातील, असे मोदी यांनी स्पष्ट केले.

“भारत के मन की बात, मोदी के साथ’ या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी भाजपने तयार केलेल्या संकल्प रथाला हिरवी झेंडी दाखविली. मोदी सरकारने गेल्या 5 वर्षांमध्ये केलेल्या विकास कामांची माहिती देण्यासाठी देशात 300 रथ तयार केले आहेत. हे रथ प्रत्येक गावात जाऊन प्रचार करणार आहेत.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बिहारच्या लोकांमुळे स्थानिक लोकांच्या रोजगारावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे विधान केले होते. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मोदी म्हणाले, बिहारी माणूस कुठेही जाऊन काम करण्याची त्याची तयारी असते. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर बिहार लोक वास्तव्याला राहतात. मराठी माणसांनीही त्यांनी स्वीकारले आहे. महाराष्ट्रातील अनेक कारखाने केवळ बिहारी कामगारांच्या भरवशावर सुरू आहेत. बिहारी मजूर जर या राज्यातील गेला तर हे कारखानेच बंद होण्याची भीती आहे, असा दावा त्यांनी केला. बिहारमध्ये कृषी उत्पन वाढायला लागल्यामुळे पंजाब मध्ये जाणाऱ्या बिहारी लोकांची संख्या कमी झाली आहे, मराठी माणसांचा बिहारी माणूस सन्मान करतात. बिहारी लोकांमध्ये मराठी माणसाबद्दल कोणताही रोष नाही. केरळ व पंजाबसारख्या संपन्न राज्यातील अनेकजण परदेशात कामासाठी गेले आहेत. अधिक पैसा कमविण्यासाठी बाहेर जाणे यात वाईट काय? वेळ आली तर पैसा मिळविण्यासाठी बिहारचे लोक चंद्रावरही जातील, असेही त्यांनी हसत सांगितले.

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा संकल्प पत्र तयार करण्यासाठी पहिल्यांदाच देशातील 10 कोटी लोकांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाची माहिती तसेच पुढील पाच वर्षात करावयाचे काम लोकांना सांगण्यात येईल.

खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पाटना येथून निवडणूक लढवून दाखवावी, मग त्यांना आपली लोकप्रियता लक्षात येईल, असा टोला मोदी यांनी लगावला. शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकतीच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची स्तुती केली होती. शत्रुघ्न सिन्हाच्या लोकप्रियतेचा एक जमाना होता. तो जमाना आता राहिलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.