स्वार्थी मित्रापेक्षा दिलदार विरोधक बरा, मुख्यमंत्र्यांकडून पवारांची स्तुती

सामना ऑनलाईन, अमरावती

स्वार्थी मित्रापेक्षा दिलदार विरोधक हा अत्यंत चांगला असतो असे सांगून शरद पवार हे दिलदार विरोधक आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांच्यावर आज स्तुतिसुमने उधळली. मात्र या विधानाचा चुकीचा अर्थ लावू नका, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

अमरावती येथील शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावर पवार यांचा सर्वपक्षीय सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह अनेक सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती होती. राजकीय पक्षांमध्ये संवाद महत्त्वाचा असतो. राज्याच्या हिताचा विषय असेल तर ते स्वतः मला फोन करून सांगतात, उपाययोजना सुचवतात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

– शेतकऱयांना कर्जमाफी हा कायमचा उपाय नाही!
शेतकऱयांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना कर्जमाफी देणे हा कायमचा उपाय नाही, असे ठाम प्रतिपादन शरद पवार यांनी आज येथे बोलताना केले. शेतकऱयांना कर्जमाफी एखाद्या वेळी करावी लागते; पण कर्जमाफी कायमचा उपाय होऊ शकत नाही. उत्पादन खर्चाचा विचार करून शेतमालाला अधिक ५० टक्क्यांनी किंमत देणे हा उपाय आहे, असे पवार यांनी यावेळी सुचविले. विदर्भात घातक कीटकनाशकांमधून विषबाधा होऊन काही दिवसांपूर्वी अनेक शेतकऱयांना आपले प्राण गमवावे लागले. या प्रकरणी १०० टक्के दोष हा राज्याच्या कृषी मंत्रालयाचाच असल्याचा आरोप शरद पवार यांनी नागपूर विमानतळावर बोलताना केला.