बोगस पोलीस उपायुक्ताची लपूनछपून तीन लग्न

सामना ऑनलाईन । मुंबई

पोलीस उपायुक्त असल्याचे सांगून नोकरी देण्याची हमी देत तब्बल ६९ तरुणांना लुबाडणाऱ्या भामट्याने तीन लग्न केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ललित सावंत असे त्या भामट्याचे नाव आहे. पोलीस सध्या सावंतची चौकशी करत असून त्याने आणखी किती महिलांना फसविले आहे याची चौकशी करत आहेत.

ललित सावंत याने २०१४ पासून पोलीसदल, रेल्वे, महानगरपालिका, मंत्रालयात नोकऱ्या मिळवून देण्याच्या आश्वासनावर अनेक तरूणांना लुबाडले आहे. आपण मुंबईचे पोलीस उपायुक्त असून सहज तुम्हाला नोकरी लावू शकतो अशी आश्वासने त्याने तरुणांना दिली होती. नोकरीसाठी तो प्रत्येक तरुणाकडून तब्बल तीन ते चार लाख रूपये घ्यायचा व फरार व्हायचा. २०१४ पासून त्याचा हा खेळ राजरोसपणे सुरू होता. मात्र २०१७ मध्ये भावीन फाल्डू या तरुणाने याबाबत मुंबईच्या गुन्हे दलाचे पोलीस सहआयुक्त संजय सक्सेना यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून सावंतला अटक केली होती.

अटकेनंतर पोलीस तपासात सावंतने तब्बल ६९ तरुणांना फसविल्याचे समोर आले. या तपासात सावंतने तीन लग्न केल्याचे देखील कबूल केले आहे. सावंतच्या दोन बायका विरारमध्येच वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहे तर तिसरीचा अद्याप पत्ता लागलेला नाही. पोलीस सध्या त्या तिसऱ्या बायकोचा शोध घेत आहे. या तिनही बायकांना सावंतच्या तीन लग्नांबद्दल माहित नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. “त्याच्या तीनही बायकांना त्याने आपण तीन लग्न केल्याची माहिती दिलेली नाही. रात्री तो कोण्या एकिकडे राहायचा आणि अन्य दोघींना रात्रपाळी असल्याचे सांगायचा. अशाप्रकारे त्याचे तिनही संसार सुरू होते.”असे मुंबई गुन्हे विभागाचे वरिष्ट पोलीस अधिकारी चिमाजी अढाव यांनी सांगितले.

सरकारी कार्यालयांची बनावट कागदपत्रे तयार करायचा
तरुणांना फसविण्यासाठी ललित सावंत यांनी सरकारी कार्यालयांची बनावट कागदपत्रे तयार केली होती. सावंत इंटरनेटवरून सरकारी कार्यालयांचे लोगो डाऊनलोड करायचा आणि हे लोगो वापरून तो सरकारी कागदपत्रं तयार करायचा. पोलीस दलात नोकरीला लावणाऱ्या तरुणांना तो पोलिसांचे गणवेश देखील शिवायला लावायचा. मात्र त्यानंतर काही तरी कारण देत तो त्यांच्याशी संपर्क तोडायचा.