बनावट शंभराच्या नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठाण्यातील चौघांना कोठडी

सामना प्रतिनिधी, नाशिक

पावणेदोन लाखांच्या बनावट शंभराच्या नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील चौघांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

शहर गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी फाटा येथे शनिवारी रात्री सापळा रचला. एका इंडिका कारच्या झडतीत एक लाख ७० हजार २०० रुपये किंमतीच्या शंभराच्या बनावट १ हजार ७०२ नोटा आढळल्या, गाडीतील प्रशांत विनायक खरात, कांतिलाल यशवंत मोकाशी, राजेंद्र बन्सीलाल परदेशी, उत्तम अरूण गोळे यांना अटक करण्यात आली आहे.

संशयिताचे पलायन व अटक
या टोळीतील कांतिलाल मोकाशी हा रविवारी सकाळी गुन्हे शाखा युनीट-१च्या कार्यालयातील शौचालयाचे गज काढून पळाला. यानंतर पोलिसांची धावपळ उडाली. मोबाईल घेवून पळालेल्या मोकाशीला तांत्रिक विश्लेषण विभागाच्या मदतीने इगतपुरीतून पकडण्यात आले.