नव्या बोगस नोटांचे पश्चिम बंगाल कनेक्शन

सामना ऑनलाईन । मुंबई

पश्चिम बंगालमधून मुंबईत येऊन मासे विक्रीच्या नावाखाली दोन हजारांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱया दोघांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाच्या अधिकाऱयांनी या दोघांकडून ४ लाख ८० हजारांच्या दोन हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या.

डोंगरीसह मुंबईत काही परिसरात दोन हजारांच्या नव्या बनावट नोटा वितरित केल्या जात असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ, सचिन कदम, सहायक पोलीस निरीक्षक सुनील पवार, हवालदार दरेकर यांच्या पथकाने या परिसरावर वॉच ठेवला. बांधकाम साइटवर काम करणारे तसेच छोटे-मोठे व्यवसाय करणाऱयांना परप्रांतीय तरुणांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली.

सुलेमान आणि सनाहुल या मासे विक्रीचा व्यवसाय करणाऱया दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दोन हजारांच्या काही नोटा सापडल्या. हुबेहूब खऱया नोटांसारख्या दिसणाऱया या नोटांचे सीरियल नंबर सारखेच होते. त्यांच्याकडून २४० बोगस नोटा जप्त करण्यात आल्या. जुन्या नोटांप्रमाणे चलनात नव्याने आलेल्या दोन हजारांच्या बोगस नोटांमध्ये पश्चिम बंगाल कनेक्शन आल्याने यामध्ये मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.