बुलढाणामध्ये कोट्यवधींच्या नकली नोटा जप्त

राजेश देशमाने । बुलढाणा

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बोराखेडी पोलिसांनी बुलढाणा रोडवरील ग्राम मोहेंगाव येथील आश्रमशाळेमागील शेतातून काही कोटींच्या नकली नोटांनी भरलेल्या बॅगेसह एकाला अटक केली आहे. तर त्याच्यासोबत असलेले आरोपी घटनास्थळाहून पळून गेले आहेत.

बोराखेडी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मोताळा तालुक्यातील ग्राम मोहेंगाव येथील आश्रमशाळेमागील शेतामध्ये करोडो रुपयाच्या नकली नोटा बाळगणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळाहून काही आरोपी फरार झाले असून पोलिसांच्या वतीने त्याचा शोध घेण्यात येत आहे. आश्रम शाळेच्या पाठीमागील शेतामधून एका आरोपीसह पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या काळ्या रंगाच्या बॅगमधून पोलिसांनी कोट्यवधी रुपये ताब्यात घेतले आहेत. ताब्यात घेतलेल्या नोटांपैकी नोटांच्या प्रत्येक गड्डीला पहिली नोट खरी आहे. तर बाकीच्या सर्व नोटा नकली आहेत. ही कारवाई ही पो.हे.कॉ. तयबअली व पो.कॉ. सुनील भवटे यांनी पार पडली. नकली नोटांचे मोजण्याचे काम रात्री उशिरापर्यंत स्थानिक ग्रामीण रूग्णालयातील कर्मचारी असलेल्या दोन पंचांसमोर सुरू होते. जप्त केलेली रक्कम सव्वा कोटी पेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

आपली प्रतिक्रिया द्या