बीडमध्ये बनावट नोटांचा अड्डा उद्धवस्त!

सामना प्रतिनिधी । बीड

बीड शहरात ५० आणि १०० रूपयांच्या बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा आज उद्धवस्त करण्यात आला. बीड पोलिसांच्या मदतीने मध्य प्रदेश पोलिसांनी कारवाई करत ही कारवाई केली. यावेळी दीड लाखांच्या नोटांसह छपाईचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपी सय्यद शकुर शब्बीरला पोलिसांनी अटक केली आहे.

बीड शहरातील गांधीनगर भागात आरोपी सय्यद शकुर याने पत्र्याच्या शेडमध्ये बनावट नोटांची छपाई कारखाना सुरू केला होता. ५० आणि १०० रूपयांच्या बनावट नोटांची छपाई करून आरोपी या नोटा मध्य प्रदेशात पाठवायचा. दरम्यान, बीड शहरातील सय्यद शकुर शब्बीर हा बनावट नोटा तयार करत असल्याची माहिती मध्य प्रदेश पोलिसांना मिळाली होती. मध्य प्रदेश पोलिसांनी यासंदर्भात बीड पोलिसांना संपर्क करून याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल कुमार जाधव आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख यांच्या पथकाने सय्यद शकुर शब्बीर यांच्या घरावर बुधवारी मध्यरात्री धाड टाकली. यावेळी घरात बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणाऱया स्कॅनरसह इतर साहित्य आणि तब्बल ५० आणि १०० रूपयांच्या दीड लाखांच्या नोटा आढळून आल्या. बनावट नोटांसह साहित्य पोलीसांनी जप्त केले. तर आरोपी सय्यद शकुर याला अटक करण्यात आली. बनावट नोटा छपाई आणि बाजारात पुरवठा करणारे मोठे रॅकेट असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले असून पोलीस याचा तपास करत आहेत.

बनावट नोटांची युक्ती तुरूंगात

सय्यद शकुर शब्बीरला बलात्काराच्या गुह्यात शिक्षा झाली होती. शिक्षा भोगत असताना त्याची ओळख मध्य प्रदेशातील एका आरोपीशी झाली.यावेळी बनावट नोटा छापण्याची तयारी केली होती. बाहेर पडल्यानंतर त्यांनी हा उद्योग सुरू केला. दरम्यान, त्याच्यासोबतच्या आरोपीची अद्याप माहिती कळू शकलेली नाही.

पाच लाखांच्या नोटा बाजारात

गेल्या दोन महिन्यांपासून सय्यद शकुर बनावट नोटा तयार करून मध्य प्रदेशात पाठवायचा. विशेष म्हणजे नोटा तयार करण्याच्या शेडकडे अधूनमधून रात्रीच्या वेळीच यायचा. दोन महिन्याच्या काळात ५ लाखांच्या ५० आणि १०० रूपयांच्या नोटा मध्य प्रदेशात पाठवल्याचे तपासाअंती समोर आले आहे. बनावट नोटांचा आणखी कुठे पाठवण्यात आल्या आहेत, यासंदर्भातील चौकशी पोलीस करत आहेत.