बनावट सोने गहाण ठेवत बँकेची 40 लाखांची फसवणूक तीनजणांविरुद्ध गुन्हा

प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन । नाशिक

बनावट सोने गहाण ठेवून दोन खातेदारांनी बिझनेस बँकेची 39 लाख 86 हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी बँक व्यवस्थापकांच्या फिर्यादीवरून गोल्ड व्हॅल्यूअरसह तीनजणांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नाशिकचे गौरव मुरलीधर मालुसरे यांनी 3 एप्रिल 2017 ला एम.जी.रोडवरील बिझनेस को-ऑप. बँकेत 881.860 ग्रॅम सोन्याचे दागिने तारण ठेवून 15 लाखांचे कर्ज घेतले. सोनिया बनसोडे नामक महिलेने 20 डिसेंबर 2017 ला 1233.540 ग्रॅम सोन्याचे वेढे तारण ठेवीत 24 लाख 86 हजार रुपयांचे कर्ज उचलले. वर्षभरात या दोघांनीही कर्जाचे हप्ते नियमित भरले नाहीत. बँकेने पाठविलेल्या नोटिसांनासुद्धा त्यांनी दाद दिली नाही. वर्षभराचे हप्ते थकल्यानंतर बँकेने तारण ठेवलेल्या सोन्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला असता ते सोने बनावट असल्याचे निदर्शनास आले. या दोन्ही खातेदारांचे सोने बँकेचे गोल्ड व्हॅल्यूअर अनिरुद्ध अविनाश मोरे यांनी तपासले होते, ते खरे असल्याचा दाखलाही दिला होता. बँकेत सोने तारण ठेवताना समक्ष हजर राहून सही केली होती. बँकेचे व्यवस्थापक विशाल अरुण दाणी यांच्या फिर्यादीवरून गुरुवारी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मोरे, मालुसरे व बनसोडे या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप चव्हाण यांनी दिली.