चुकीचा चित्रपट बनवाल तर लोकांच्या प्रतिक्रियाही तशाच येतील- नाना पाटेकर

2

सामना ऑनलाईन । मुंबई

देशभरात विरोधाचा सामना करावा लागलेला पद्मावत हा वादग्रस्त चित्रपट येत्या २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिली असली तरी अनेक ठिकाणी चित्रपटाला विरोध होताना दिसत आहे. पद्मावतवर निरानिराळ्या स्तरांवर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनीही पद्मावतवर प्रतिक्रिया दिली असून ‘चुकीचे चित्रपट बनवाल तर लोकांच्या प्रतिक्रियाही तशाच येतील’ असं त्यांनी म्हटलं आहे.

नाना पाटेकर यांनी त्यांचा आगामी मराठी चित्रपट आपला मानूसच्या स्क्रीनिंगवेळी प्रश्नोत्तरात पद्मावतवरचं त्यांचं मत मांडलं. सर्वोच्च न्यायालयाने पद्मावतच्या प्रदर्शनाला परवानगी दिली आहे. पण, ऐतिहासिक चित्रपटांना बनवणं किंवा प्रदर्शित करणं हे सध्याच्या जगात अवघड आहे का, हा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना नाना पाटेकर यांनी म्हटलं की, ”खरंतर कोणतीही गोष्ट तितकीसी कठीण नाही. जर सेन्सॉर बोर्डाने आणि सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे तर हा चित्रपट प्रदर्शित होणारच. पण, योग्य विषयावर चित्रपट बनवणंही गरजेचं आहे.”

चित्रपट म्हणजे काही पुस्तक आहे का, ज्यावर बंदी आणता येईल? या प्रश्नावर नाना म्हणाले की, ”चित्रपटाला होणारा विरोध चुकीचा आहे. पण, इतिहासाशी छेडछाड झाली तर संबंधित समाजाला वाईट वाटणंही स्वाभाविक आहे. ही निर्मात्यांची जबाबदारी आहे, की चित्रपट बनवताना योग्य विषयाची निवड करावी.”